नाथाभाऊ पराभूत नाही : 30 वर्षातील विकास आपल्यामुळेच
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानंतर एकनाथराव खडसेंचा टोला
मुक्ताईनगर : मुक्ताईनगर मतदारसंघात गेल्या 40 वर्षापासून काम करीत असून त्यांनी नाथाभाऊला पराभूत केले नाही तर अजुनही नाथाभाऊ कायम असल्याचेही माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सांगत गेल्या 30 वर्षात मुक्ताईनगर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतांना जे विकासात्मक काही उभे राहिले ते केवळ नाथाभाऊंमुळेच उभे राहिले असल्याचा टोला त्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या विधानावर लगावला. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काहीच न देता गेले आणि भ्रमनिरास झाला, अशी टिकाही खडसेंनी केली. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीचा मुक्ताईनगर येथे शेतकरी मेळावा झाला. त्या मेळाव्यात उध्दव ठाकरे यांनी भाजपाच्या उमेदवाराचा पराभव करून मुक्ताईनगरला मुक्त केल्याबद्दल जनतेचे आभार मानुन खडसेंना चिमटा घेतला होता. या संदर्भात भाजपाचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
मुख्यमंत्री काहीही न देता परतले
ज्या योजनांची नावे घेतली त्या सर्व योजना नाथाभाऊमुळे झाल्या. मुक्ताईनगर मतदारसंघात कृषी महाविद्यालयासाठी 100 एकर जमीन मोफत दिली, ती दानत केवळ नाथाभाऊकडेच होती. अल्पसंख्यांकांसाठीची कामे, वसतीगृह, बोदवड उपसा सिंचन योजना, ओडीए योजना, पिण्याच्या पाण्याच्या योजना जे जे नविन काम दिसेल ते नाथाभाऊनेच केले आहे. याउलट काही कामांसाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी निधी देण्याची भाषा केली असती तर आनंद वाटला असता. मात्र मुख्यमंत्री काहीच न देता निघुन गेल्याचे वाईट वाटते. योजनांना पैसा देऊ एवढा शब्द जरी उच्चारला असता तरी समाधान वाटले असते असा टोलाही एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लगावला.


