मोदी सरकार अच्छे दिन आणण्यासाठी सकारात्मक निर्णय घेणार !
नवी दिल्ली : अर्थव्यवस्थेचा ढासळत असलेला तोल, वाढत असलेली बेरोजगारी तसेच आर्थिक मंदीचे सावटामुळे देशाच्या आर्थिक आघाडीवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून ढासळत्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार लवकरच काही मोठे आणि धक्कादायक निर्णय घेण्याची शक्यता आहे. करांमध्ये सवलत, तसेच नोकर्या टिकवण्यासाठी आवश्यक ते धोरणात्मक निर्णय अशा घोषणांची सुरुवात आजपासून होण्याची शक्यता आहे. आर्थिक संकटाशी झुंजत असलेल्या उद्योगांना पॅकेज देण्याबाबतचे संकेत आधीच मिळाले होते मात्र सरकार केवळ आर्थिक पॅकेजवर थांबण्याची शक्यत नाही.
सरकारी खर्चात होणार कपात
उद्योगांना पॅकेजची घोषणा करण्यात आल्यानंतर तत्काळ इतरही काही मोठे निर्णय घेतले जातील. यामध्ये सरकारी खर्चात कपातीसारखा मोठा निर्णयही समाविष्ट असू शकतो. पंतप्रधान कार्यालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गात कुठलेही अडथळे येऊ नयेत, अशा उद्देशाने हे मोठे निर्णय घेतले जाणार आहे. खर्चामध्ये बचत करण्यासाठी सर्वप्रथम मंत्री आणि सरकारी अधिकार्यांना देण्यात येणार्या अनावश्यक सुविधा आणि दैनंदिन खर्चात कपात केली जाईल. मात्र कल्याणकारी योजनांसाठीच्या निधीमध्ये कुठलीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले.
याबाबत होवू शकतात निर्णय
सर्वसामान्यांसह उद्योगांना करांमध्ये दिलासा देण्यासाठी विचार होवू शकतो तसेच उद्योग क्षेत्रातील कर्मचार्यांच्या नोकर्या टिकवण्यासाठी उद्योगांना वेगळ्या पद्धतीचे पॅकेज देण्याची तयारी तसेच गुंतवणूक वाढवण्यासाठी देशातील आणि परदेशातील गुंतवणुकदारांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी साधू शकतात संवाद व सरकारमधील अनावश्यक खर्चांना फाटा देऊन दोन वर्षांत सुमारे 75 हजार कोटी रुपये वाचवण्याचे लक्ष्य सरकारचे असू शकते.