40 हजारांची लाच भोवली : धुळ्यातील आझादनगर पोलीस ठाण्यातील एएसआय एसीबीच्या जाळ्यात

लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ : 12 वर्षानंतर संशयितावर दुसर्‍यांदा ट्रॅप


40 thousand bribe: ASI of Azadnagar police station in Dhule in ACB’s net धुळे : विमा प्रकरणात सकारात्मक अहवाल देण्याच्या मोबदल्यात तडजोडीअंती 40 हजारांची लाच स्वीकारताना धुळ्यातील आझादनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आरीफअली सैय्यद (55, आविष्कार कॉलनी, चाळीसगाव रोड, धुळे) यांना धुळे एसीबीने गुरुवारी दुपारी लाच स्वीकारताच अटक केली. धुळ्यातील गिंदोडीया चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यामागील भाग्यश्री पान कॉर्नरसमोर हा सापळा यशस्ीव करण्यात आला.

असे आहे लाच प्रकरण
लाच प्रकरणातील तक्रारदार यांच्या चुलतभावाचे 22 ऑगस्ट 2021 रोजी अपघाती निधन झाले व त्यांच्या हयातीत एचडीएफसी अ‍ॅग्रो कंपनीचा दोन कोटींचा विमा काढला होता. मृत्यूनंतर विमा प्रतिनीधीने पॉलीसीची रक्कम मूळ वारसांच्या नावावर जमा न करता परस्पर दुसर्‍यांच्या नावे जमा करीत फसवणूक केल्याने आझादनगर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचे तपासाधिकारी सहायक पोलीस उपनिरीक्षक आरीफअली सैय्यद होते. विम्याची रक्कम दुसर्‍यांच्या नावे जमा झाल्यानंतर ती गोठवण्यात आली व ही रक्कम मूळ वारसांच्या बँक खात्यात जमा होण्याकरीता तक्रारदार यांच्या वहिनीने कोर्टात अर्ज केला. या अर्जावरून कोर्टात सकारात्मक ‘से’ अहवाल देण्याकरीता तपासी अधिकारी सहायक पोलीस उपनिरीक्षक आरीफअली सैय्यद 27 फेब्रुवारी रोजी 50 हजार रुपये लाच मागितली मात्र त्यात तडजोड होवून 40 हजार रुपये देण्याचे ठरले.

पान टपरीवर स्वीकारली लाच
तक्रारदार यांना लाच द्यावयाची नसल्याने त्यांनी मंगळवार, 27 फेब्रुवारी रोजी धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर लाच पडताळणी करण्यात आली व लाच मागितल्याचे स्पष्ट होताच सापळा रचण्यात आला. धुळ्यातील गिंदोडीया चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यामागील भाग्यश्री पान कॉर्नरसमोर तक्रारदाराकडून आरीफअली सैय्यद यांनी लाच स्वीकारताच पथकाने त्यांना अटक केली. संशयिताविरोधात आझाद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मंजीसिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, राजन कदम, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रवीण पाटील, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने यशस्वी केला.

12 वर्षानंतर दुसर्‍यांदा झाला ‘ट्रॅप’
सहायक पोलीस उपनिरीक्षक आरीफअली सैय्यद हे सोनगीर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असतांना त्यांच्यावर 22 जुलै 2010 रोजी 70 हजार रुपये स्वीकारताना एसीबीने ट्रॅप केला व धुळे शहर पोलिसात गुन्हा दाखल केला. धुळे जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना 2013 मध्ये पाच वर्ष शिक्षा सुनावताच त्यांना पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले मात्र उच्च न्यायालयाने सन 2019 मध्ये त्यांना दिलासा दिल्याने ते पोलीस खात्यात पुन्हा हजर झाले मात्र पैशांची हाव न सुटल्याने पुन्हा ते धुळे एसीबीच्या जाळ्यात अडकले.


कॉपी करू नका.