रावेरात राष्ट्रवादीच्या बैठकीत स्वकीयांनी वाचला समस्यांचा पाढा
रावेर : शहरात झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांच्या स्वकीयांनीच तक्रारीचा पाढा वाचल्याने खळबळ उडाली. तालुक्यातील प्रशासकीय अधिकारी आमचे ऐकत नाही, स्वकीय आम्हाला विश्वासात घेत नसल्याचे सांगत शहराध्यक्ष महेमूद शेख व विलास ताठे यांनी तक्रारीचा पाढा वाचल्याने राष्ट्रवादीची बैठक चांगलीच गाजली.
यांची बैठकीला उपस्थिती
या बैठकीला माजी आमदार अरुण पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सोपान पाटील, महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, सेवा दलाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश पाटील, जिल्हा परीषदेचे माजी सदस्य रमेश पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, पंचायत समिती दीपक पाटील, शहराध्यक्ष मेहमूद शेख, पी.आर.पाटील, विलास ताठे, पिंटू महाजन, कविता गोडसे, माधुरी भूसे, विनोद पाटील, श्रीकांत चौधरी, अरविंद पाटील, देवानंद पाटील, लक्ष्मण मोपारी, विनोद पाटील, ईश्वर निळे, पांडुरंग पाटील, संतोष महाजन, शशांक पाटील आदींसह तालुकाभरातून राष्ट्रवादी पदाधिकारी, लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यकर्त्यांनी जनतेत जावून काम करावे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी जनतेमध्ये जावून काम केले पाहिजे, त्यांच्या समस्या सोडविल्या पाहिजे, पक्षाचे संघटन बळकट करून येणार्या पंचायत समिती, जिल्हा परीषद, बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचारधारेचे लोक निवडून आणावेत तसेच आपापसतील मतभेद विसरून राष्ट्रवादीचे विचार ग्रामीण भागात पोहचविण्यासाठी सर्वांनी मिळून काम करावे, असे आवाहन आवाहन माजी आमदार अरुण पाटील यांनी केले.
विविध समित्यांबाबत महाविकास आघाडी ठरली
जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय सर्व समितीत्यांचे ठरले असून उदाहरण म्हणून रावेरात काँग्रेसचे आमदार असल्यास 60 टक्के त्यांची लोक तर 20 टक्के शिवसेना तर 20 टक्के राष्ट्रवादीचे लोक राहतील व यापुढे आपसी मतभेद न करण्याची तंबी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या यांनी उपस्थितांना दिली.
