यावल-भुसावळ रस्त्यावर दुचाकीला कारची धडक : वयोवृद्ध गंभीर

0

A two-wheeler collided with a car on the Yaval-Bhusawal road : Elderly serious यावल : शहरातील भुसावळ रस्त्यावर असलेल्या टेलिफोन ऑफिससमोर दुचाकीला चारचाकी वाहनाने समोरून धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीस्वार 65 वर्षीय वृद्ध गंभीर जखमी झाला. जखमीवर यावल ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारार्थ जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले. जखमी वयोवृद्धाची प्रकृती गंभीर आहे.

वयोवृद्धाची प्रकृती गंभीर
यावल शहरातून भुसावळकडे जाणार्‍या रस्त्यावर टेलिफोन ऑफिस आहे. या टेलिफोन ऑफिस समोरून दुचाकीद्वारे अशोक किसन तायडे (65, रा.आंबेडकर नगर, बोरावल गेट, यावल) हे जात होते. त्यांच्या दुचाकीला भुसावळकडून यावलकडे भरधाव वेगाने जाणार्‍या कार (क्रमांक एम.एच. 14 के. एफ. 2170) वरील चालक अनिकेत नारखेडे (रा.बुलढाणा) याने धडक दिली. या अपघातामध्ये अशोक तायडे यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने यावलचे माजी उपनगराध्यक्ष प्रा.मुकेश येवले, काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान, राष्ट्रवादीचे हितेश गजरे, युवराज सोनवणे हे दाखल झाले. त्यांनी जखमी अवस्थेत अशोक तायडे यांना तेथून तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणले. यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत जावळे, अधिपरिचारिका आरती कोल्हे, अमोल अडकमोल, भूषण गाजरे यांनी प्रथमोपचार केले. तायडे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने पुढील उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून प्रकृती सध्या गंभीर आहे.


कॉपी करू नका.