भुसावळ विभागात प्रभू श्रीराम नामाचा जयघोष

श्रीरामनवमीनिमित्त मंदिरांमध्ये भाविकांची मांदियाळी : विविध कार्यक्रमांचे आयोजन

0

Chanting of Lord Shri Ram in Bhusawal Division भुसावळ : भुसावळ शहरासह विभागातील प्रभू श्रीराम मंदिरात रामनवमीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सर्वत्र दिवसभर भाविकांची दर्शनार्थ गर्दी झाली होती. भुसावळातील जामनेर रोडवरील साईबाबा मंदिरापासून काढण्यात आलेल्या पालखीच्या अग्रभागी आळंदी येथील शंभर टाळकरी वारकरी विठूचा नामघोष करीत होते. ते येणार्‍या जाणार्‍यांना आकर्षीक करीत होते तर भाविकांना साबुदाणा खिचडीचे वाटप मंदिरांमध्ये करण्यात आले. श्रीराम जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील श्रीराम मंदिरे फुलांनी व रोषणाईने सजविण्यात आली.

यावल शहरात पालखी व शोभायात्रा
यावल : शहरात सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील सकल हिंदू समाज व हिंदू राष्ट्र सेना यांच्या संयुक्तविद्यमाने श्रीराम नवमीनिमित्त बुधवारी सायंकाळी सहा वाजेला भव्य पालखी व शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेतील सजीव देखाव्यात असलेल्या प्रभु श्रीरामांसह विविध दहा प्रकारच्या पथकांनी भाविक, भक्तांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. मोठ्या उत्साहात रेणुका देवी मंदिरापासून निघालेली शोभायात्रा शहरातील मेनरोड वरून मार्गस्त होत श्री कोहळेश्वर श्रीराम मंदिरात दाखल झाल्यानंतर तिचा समारोप झाला. यावल शहरात बुधवार, 17 एप्रिल रोजी श्रीराम नवमी निमित्त सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील पालखीसह शोभायात्रा काढण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते सायंकाळी सहा वाजेला रेणुका देवी मंदिरापासून या पालखीसह शोभायात्रेला सुरवात झाली. यात इस्कॉन, राधेकृष्ण महिला मंडळाच्या कलशधारी महिला, त्यांच्या पाठोपाठ सजीव देखाव्यातून प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता व शबरीमाता, विविध देवी-देवता, वानरसेना सह विविध शारीरिक कसरतीचा आखाडा, तारकेश्वर भजनी मंडळ, झांज पथक, वारकरी संप्रदाय यांचे पथक व श्रीरामाची पालखी, श्रीरामांची भव्य मूर्ती असे विविध 10 पथक या शोभायात्रेत सहभागी होते. शहरातून निघालेल्या या मिरवणुकीने भाविक-भक्तांच्या डोळ्यांचे पारणेचं फेडले. रेणुका देवी मंदिरापासून निघालेली ही शोभायात्रा मेन रोडवरून बेहडे सुपर शॉप, गवत बाजार, सार्वजनिक वाचनालय, पंचवटी मार्गे श्री कोहळेश्वर श्री राम मंदिरात आली व येथे या शोभायात्रा व पालखीचा समारोप करण्यात आला. या शोभायात्रे करीता सकल हिंदू समाज व हिंदू राष्ट्र सेना यांच्या वतीने नियुक्त श्रीराम नवमी पालखी शोभायात्रा समितीमार्फत परिश्रम घेण्यात आले.

भुसावळात भक्तीगीतांनी राम जन्मोत्सव उत्साहात साजरा
भुसावळ : जामनेर रोडवरील श्री गजानन महाराज देवस्थानतर्फे राम नवमीनिमित्त रामजन्मोत्सव सोहळ्यादरम्यान बहारदार भक्तगीते सादर केल्याने भाविक मंत्रमुग्ध झाले. बुधवार, 17 रोजी प्रारंभी श्रींचे स्नान अभिषेक पूजा पहाटे 5:30 ते 7.30 दरम्यान झाल्यानंतर दुपारी 12 वाजता राम जन्मोत्सवानिमित्त पाळणा म्हटला गेला. ाम जन्मला सखी, गा बाळांनो श्री रामायण, सेतू बांधा रे, दशरथा घे हे पयासदान, कानडा राजा पंढरीचा, अबीर गुलाल उधळीत रंग, रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा, आदी भक्तीगीते गायक किरण सोहळे व वरुण नेवे यांनी सादर केली. त्यांना साथसंगत तबलावादक उमेश सूर्यवंशी व हार्मोनियम सुयोग गुरव यांनी वाजवले. गण गण गणात बोते तसेच श्री रामाचा जय जयकार करीत भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

सावद्यात रामनवमी उत्साहात : दर्शनासाठी भाविकांची गर्दी
सावदा : सावदा शहरात विविध ठिकाणी रामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. सुंदर राम मंदिरात रामजन्मोत्सव उत्साहात साजरा झाला. यावेळी संजयबुवा जळगावकर यांचे राम जन्माचे सुश्राव्य कीर्तन झाले. यानंतर पाळणा झाला. दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. सायंकाळी भव्य पालखी सोहळा आयोजित करण्यात आला. यात मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. दरम्यान गुरुवार, 18 रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. विठ्ठल मंदिरात देखील राम जन्मोत्सवानिमित्त सुंदर अशी राम फळांची आरास करण्यात आली. स्वामीनारायण मंदिरातदेखील राम जन्मोत्सव झाला तसेच ढोकळे राम मंदिरात देखील राम जन्मोत्सव व विविध धार्मिक कार्यक्रम झाले,. शहरातील विविध मंदिरात देखील धार्मिक कार्यक्रम झाले.


कॉपी करू नका.