महाराष्ट्रातील आठ मतदारसंघात 53.70 टक्के मतदान

0

मुंबई : महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 63.70 टक्के मतदान झाले असलेतीर दुसर्‍या टप्प्यात मात्र मतदानाची टक्केवारी घसरल्याचे दिसून आले. लोकसभेच्या दुसर्‍या टप्प्याचे राज्यात मतदान झाले मात्र सायंकाळी सहा वाजेपर्यंत आलेल्या अंदाजे आकडेवारीनुसार आठ मतदारसंघांत 53.70 टक्के मतदान झाले.

उन्हाच्या तडाख्यामुळे मतदानावर परिणाम
एकूण मतदानात काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे. परंतु तरीही ही वाढ फारशी नसणार असून ती पाहता मतदारांनी पाठ फिरविल्याचे दिसत आहे. उन्हाचा कडाका, लग्नसराई आणि राज्यातील राजकीय खिचडी यामुळे मतदारांत निरुत्साह असल्याचे दिसत आहे.

राज्यात दुसर्‍या टप्प्यातील आठ मतदारसंघात सायंकाळी 6 वाजेपर्यंत 53.70 टक्के मतदान झाले आहे. यामध्ये वर्धा- 56.66 टक्के, अकोला- 52.49 टक्के, अमरावती- 54.50 टक्के, बुलढाणा- 52.24 टक्के, हिंगोली- 52.03 टक्के, नांदेड- 52.47 टक्के, परभणी- 53.79 टक्के, यवतमाळ-वाशिम- 54.04 टक्के एवढे मतदान झाले आहे.

देशातील 88 मतदारसंघांत सरासरी 61 टक्के मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्यातील 102 मतदारसंघांत 65.5 टक्के मतदान झाले आहे. कमी झालेले मतदान कोणाच्या फायद्याचे कोणाच्या तोट्याचे हे निकालाअंतीच कळणार आहे.


कॉपी करू नका.