मुंबईत होर्डिंग्ज कोसळले : आठ जणांचा मृत्यू ; 66 नागरिक जखमी


Hoardings collapse in Mumbai : eight dead ; 66 civilians injured मुंबई : मुंबईच्या घाटकोपरमधून धक्कादायक बातमी समोरली आहे. लोखंडी होर्डिंग्ज कोसळून झालेल्या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली. या दुर्घटनेत एकूण 66 जण जखमी झाले आहेत तर ढिगार्‍याखाली अजूनही 20 ते 30 लोक अडकल्याची भीती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि पाहणी करून माहिती घेतली. घडलेल्या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली असून जखमींवर सरकारी खर्चाने उपचार केले जात आहेत.

मुख्यमंत्र्यांची भेट : स्ट्रक्चरल ऑडीटचे आदेश
घाटकोपर दुर्घटनेच्या ठिकाणी सोमवारी रात्री आठ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. यावेळी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, ही घटना दुर्दैवी आहे. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे तर जखमींवर सरकारी खर्चाने उपचार केले जाणार आहेत. याशिवाय मुंबईतील सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. घाटकोपर प्रकरणातील आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल. मुंबईतील ऑडिट करून अनधिकृत होर्डिंग कापून टाकण्याचे आणि अशा होर्डिंग संबंधित लोकांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी शिंदे यांनी माहिती दिली.

रेल्वे व जाहिरात कंपनीविरोधात कारवाई होणार
बीएमसीकडून रेल्वे आणि जाहिरात कंपनी इगो मीडिया विरोधात तक्रार दाखल केली जाणार आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यासाठी तक्रार दाखल केली जाईल, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क अधिकार्‍यांकडून देण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !