यावल वनविभागात प्राणी गणनेसाठी मचाण उभारणीला वेग


यावल : यावल तालुक्यातील सातपुडा वनक्षेत्रात वनविभागाकडून बुद्ध पौर्णिमेला जंगलात प्राणी गणना करण्यासाठी पूर्वतयारी म्हणून मचाण उभारणीसह आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. यावल वन विभागात एकूण 43 मचाण उभारल्याची माहिती यावल वनविभागाचे सह.वन संरक्षक प्रथमेश हाडपे यांनी दिली आहे.

43 ठिकाणी मचाणांची उभारणी
यावल वनविभाग अंतर्गत असलेल्या चोपडा वनक्षेत्रात तीन, वैजापूर वनक्षेत्रात सात, अडावद वनक्षेत्र चार, देवगिरी क्षेत्रात चार, यावल पूर्व वनविभाग सात, यावल पश्चिम वनविभाग सहा, रावेर वनक्षेत्र 12 अशा एकूण 43 मचाण उभारण्यात आल्या आहेत. बौद्ध पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या शीतल व लख्ख प्रकाशात जंगलातील प्राण्यांचे विविध थरार अनुभवण्याची संधी यावर्षीही जंगल सफारींना अनुभवता येईल. एका मचाणावर पाच ते सहा व्यक्ती बसू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. जंगलातील असलेल्या पाणवट्यावर प्राणी पाणी पिण्यासाठी येत असताना जंगलात भटकंती करत असताना प्राण्यांची गणना केली जाते. काही ठिकाणी ट्रॅप कॅमेराद्वारे सुद्धा गणना केली जाते.



निसर्गप्रेमींना अनुभवता येणार थरार
नवखे निसर्ग प्रेमी, निसर्ग अभ्यासक, विध्यार्थी यानाही जंगलातील थरार अनुभवता येईल. यावल वन विभागात अस्वल, बिबट, सांबर, वाघ, चितळ, रेडकी, चौशिंगा, सायळ यासह विविध पक्षी, सरपटणारे प्राणी व तसेच दुर्मिळ प्राणी सुद्धा नजरेस पडतात. वनविभागातील प्राणी गणना ही धुळे प्रादेशिक वन विभागाच्या वनसंरक्षक निनू सोमराज, यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक जमीर एम.शेख, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व वनविभागाचे यावल वनपरिक्षेत्राचे अधिकारी स्वप्नील फटांगरे, पश्चिम क्षेत्राचे वनपरिक्षेत्राचे सुनील भिलावे, रावेर विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे, चोपडा वनक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी वनपाल वनरक्षक व वनमजूर करणार आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !