पुणे उत्पादन शुल्क विभागात आंदोलन : बार आणि पब माध्यमातून 500 कोटींची वसुली
आमदार रवींद्र धंगेकर व सुषमा अंधारे यांनी वाचून दाखवली हप्त्याची यादी
Agitation in Pune Excise Department : Recovery of 500 crores through bars and pubs पुणे : पुण्यातील बिल्डर पुत्राने केलेल्या अपघातानंतर राजकारण पेटले आहे. त्यातच राज्य उत्पादन शुल्क विभागाची हप्तेखेारी आमदार रवींद्र धंगेकर व सुषमा अंधारे यांनी आंदोलन करीत समोर आणली आहे. पुणे जिल्ह्यातील कोणत्या बार आणि पब मालकाकडून किती हप्ता दिला जातो तसेच कोणत्या अधिकाराला दिला जातो याची यादीच आमदार रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी अधिकार्यांसमोर वाचून दाखवल्यानंतर खळबळ उडाली.
वर्षभरात पाचशे कोटींची वसुली
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागावर गंभीर आरोप करीत गत वर्षभरात पुणे जिल्ह्यातील बार आणि पब माध्यमातून 500 कोटी रुपयांची वसुली झाली असल्याचा आरोपही सुषमा अंधारे यांनी यावेळी केला. हातात खोके आणि पैसे घेत महाविकास आघाडीतील नेत्यांनी पुण्यात आंदोलन केले. पुण्याची अवस्था ही उडता पंजाब सारखी झाली असल्याचा आरोप यावेळी सुषमा अंधारे यांनी केला. उत्पादक शुल्क विभागाची वसुलीची यादी वाचली तर ती लग्नातील आहेराची यादी वाचण्यासारखे असल्याचे देखील सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.

तुम्ही पुणेकरांच्या जीवाशी खेळत आहात
मागील वेळी ललित पाटील प्रकरणात देखील आम्ही या वसुलीचा आरोप केला होता. त्यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांनी आमच्यावर गुन्हे दाखल करण्याची भाषा केली. ललित पाटील प्रकरणात देखील अजय तावरे यांचे नाव घेतले होते. त्यांच्या अटकेची मागणी केली होती. मात्र, वेगवेगळ्या खात्याच्या मंत्र्यांनी दबाव आणून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. एकाही पोलिस अधिकार्याशी आमचे वैर नाही. मात्र तुम्ही पुणेकरांच्या जीवाशी का खेळत आहात? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.
धंगेकर संतापले : मला शहाणपणा शिकवू नका
आमदार धंगेकर आरोप करीत असताना एका अधिकार्याने स्पष्टीकरण दिले मात्र धंगेकर चांगलेच संतापले. एक आमदार म्हणून मी या ठिकाणी बोलायला आलो आहे. त्यामुळे मला शिकवू नका, असा कडक इशारा आमदार रवींद्र धंदेकर यांनी राज्य उत्पादन विभागातील अधिकार्यांना दिला. तुम्ही विधानसभेत नाही तर माझ्यासमोर बोलत आहात. त्यामुळे मला शहाणपणा शिकवू नका, अशा शब्दात रवींद्र धंगेकर यांनी अधिकार्यांना चांगलेच सुनावले.
अधिकार्यांनी सर्व आरोप फेटाळले
आमदार रवींद्र धंगेकर आणि आणि सुषमा अंधारे यांनी आमच्यावर केलेले आरोप पूर्णपणे चुकीचे असल्याचा दावा संबंधीत अधिकार्यांनी या वेळी माध्यमांसमोर केला.