निफाडमध्ये सुखोई विमान कोसळले : वैमानिक सुरक्षित
निफाड : निफाड तालुक्यातील शिरसगाव येथील एका शेतात सुखोई -30 लढाऊ विमान कोसळताच त्यास आग लागली. या विमानात 2 वैमानिक होते. त्यांनी प्रसंगावधान राखून वेळीच पॅराशूटने विमानाबाहेर उडी मारल्यामुळे ते बचावलेत. हे दोघे वैमानिक किरकोळ जखमी झाले असून त्यांना लगतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नाशिक रेंजचे विशेष महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी ही माहिती दिली.
तांत्रिक बिघाडाने कोसळले विमान
सूत्रांच्या माहितीनुसार, हे विमान तांत्रिक बिघाडामुळे कोसळले असल्याची शक्यता आहे. या अपघाताची माहिती मिळताच एचएएल येथील टीमने घटनास्थळी धाव घेतली. हे विमान द्राक्षाच्या एका बागेत कोसळले आहे. त्यामुळे या बागेचे मोठे नुकसान झाले आहे.

भारतीय हवाई दलाच्या सुखोई-30 लढाऊ विमानांचा पुण्यात तळ आहे. अपघातग्रस्त विमानाने तेथूनच उड्डाण घेतल्याचे सांगण्यात येत आहे. तथापि, याबाबत अधिकृत माहिती नाही. स्थानिक पोलिस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे.