अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न : दहिवदच्या तरुणाचा ट्रकच्या धडकेने मृत्यू
चोपडा : अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या अमळनेर तालुक्यातील दहिवदच्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला. लग्नाचा अल्बम घेण्यासाठी जात असताना तरुणाच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली. चोपडा तालुक्यातील धानोराच्या पुढे पुलाजवळ पिरोबाच्या मंदिराजवळ मंगळवार, 2 जुलै रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास हा अपघापत घडला. चेतन गणेश माळी (22, रा.दहिवद, ता.अमळनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे.
ट्रकची दुचाकीला धडक
चेतन माळी हा तरुण अमळनेर तालुक्यातील दहिवद येथे आई, वडील, पत्नी, भाऊ, बहिण यांच्यासह राहत होता. तो पुण्यात नोकरी करून हातभार लावत होता. त्याचे तीन महिन्यांपूर्वी चोपडा तालुक्यातील लासूर येथील तरुणीशी लग्न झाले होते. मंगळवार, 2 जुलै रोजी चेतन हा सकाळी अडावद येथे त्याच्या लग्नाचा अल्बम घेण्यासाठी मावसभाऊ जीवन गजानन माळी (24, रा. किनगाव ता. यावल) याच्यासह गेला होता.

चोपडा तालुक्यात धानोराच्या पुढे पुलाजवळ पिरोबाच्या मंदिरापाशी चेतनच्या दुचाकीला ट्रकला धडक बसल्याने त्याच्या डोक्याला आणि डाव्या हाताला जबर मार लागल्यामुळे तो गंभीर जखमी झाला तर मावस भाऊ जीवन माळी हा किरकोळ जखमी झाला. दोघांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी चेतन माळी याला मयत घोषित केले. यावेळी कुटुंबियांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला. या घटनेबाबत धानोरा पोलिसात अपघात प्रकरणी नोंद करण्याचे काम सुरू होते.
