थोरपाणीतील पावरा कुटुंबाच्या वारसांना जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते मदतीचे वितरण


यावल : यावल तालुक्याच्या पश्चिम भागात सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम क्षेत्रात थोरपाणी या आदिवासी वस्तीत वादळात घर कोसळून एकाचं कुटुंबातील चौघे ठार झाले होते. या कुटुंबातील वारसांना शुक्रवारी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शासकिय मदत वितरण करण्यात आली. प्रत्येकी मयत चार लाख रुपयांप्रमाणे 16 लाखांची शासकीय मदत प्राप्त होती. वारस मुलगा अल्पवयीन असल्याने यातील 15 लाखांची एफ.डी.करण्यात आली तर एक लाख रुपये मुलाच्या बँक खात्यात टाकण्यात आले.

पावरा कुटूंबाला 16 लाखांची मदत
यावल तालुक्यातील पश्चिम भागात वाघझिरा गावाच्या पुढे सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम क्षेत्रात थोरपाणी हे आदिवासी पाडे आहे. येथे राहणार्‍या नानसिंग पावरा (33), त्यांची पत्नी सोनुबाई पावरा (28), मुलगा रतीलाल पावरा (4) व मुलगी बाली पावरा (2) हे चौघे 26 मे रोजी वादळी वार्‍यात घर कोसळल्याने ढिगार्‍याखाली दाबले जावून ठार झाले होते. या दुर्घटनेत शांतीलाल पावरा हा बालक बचावला होता. या मुलास शासकीय पातळीवर भरीव अशी शासनाची मदत मिळावी याकरीता केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व महाराष्ट्र राज्याचे पुर्नवसन मंत्री अनिल पाटील, चोपडा आमदार लता सोनवणे यांनी प्रयत्न केले. मयत प्रत्येकी चार लाख प्रमाणे एकूण 16 लाखांची मदत शासनाकडून जाहिर करण्यात आली.

शुक्रवारी यावल येथील वनविभागाच्या विश्रामगृहात मयताचे वारस शांतीलाल बारेला यास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याहस्ते आर्थिक मदतीचे वितरण करण्यात आले. शांतीलाल बारेला अल्पवयीन असल्याने 15 लाख रुपयाची मुदत ठेव अर्थात एफडी करण्यात आली आहे व एक लाख रुपये बालकाच्या बँक खात्यात टाकण्यात आले. प्रसंगी यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, मंडळाधिकारी मिलिंद देवरे, तलाठी वसीम तडवी उपस्थित होते.


कॉपी करू नका.