मांगलवाडी येथे वीज चोरी : तिघांविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा
यावल : रावेर तालुक्यातील तांदलवाडी कक्ष अंतर्गत येणार्या मांगलवाडी या गावात वीज चोरी विरुद्ध धडक मोहिम राबवण्यात आली. यामध्ये त्यांना तिघे वीज चोरी करतांना आढळले. या तिघांना त्यांनी चोरी केलेल्या वीज युनिटनुसार दंड आकारून दंड भरण्याची नोटीस देण्यात आली मात्र तिघांनी वेळेत दंड अदा न केल्याने तिघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे वीज चोरी प्रकरण
मांगलवाडी, ता.रावेर या गावात तांदलवाडी कक्षाचे सहाय्यक अभियंता रवींद्र पदमे यांच्या मार्गदर्शनाखाली 8 एप्रिल 2024 रोजी वीज चोरी विरुद्ध धडक मोहिम राबवण्यात आली. यात अनिल बळीराम कोळी, कृष्णा मीना भोलंकर व सोपान मोतीराम तायडे हे तिघे चोरी करतांना आढळून आले. या तिघांनी मागील सहा महिन्यात 450 युनिट वीज चोरी केल्याचा अंदाज होता व त्यांना वीज चोरीची रक्कम 10 हजार 212 रूपये व तडजोड रक्कम सहा हजार आकारून दंड भरण्याची नोटीस देण्यात आली मात्र या तिघांनी वेळेत दंड न भरल्याने तिघांविरुद्ध भारतीय विद्युत अधिनियम 2003 चे कलम 135 अन्वये यावल पोलीस ठाण्यात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपासकामी हा गुन्हा यावल पोलीस ठाण्याकडून निंभोरा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला.

