निरूळ येथे वीज चोरी : पाच जणांविरोधात गुन्हा
यावल : रावेर तालुक्यातील खानापूर राज्य विद्युत वितरण कक्ष अंतर्गत निरूळ या गावात जुलै 2022 मध्ये वीज चोरी विरुद्ध धडक मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेमध्ये गावात त्यांना पाच जण वीज चोरी करताना आढळले. चोरी केलेल्या वीज युनिटनुसार संबंधिताना दंड आकारून नोटीस देण्यात आली मात्र, त्या पाचही जणांनी दोन वर्ष दंड न भरल्याने यावल पोलीस ठाण्यात सोमवारी पाच जणांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
असे आहे वीज चोरी प्रकरण
राज्य विद्युत वितरण खानापूर ता.रावेर येथील राज्य विद्युत किरण कक्षाचे सहाय्यक अभियंता गणेश सुधाकर दहिभात यांच्या नेतृत्वात 6 जुलै 2022 रोजी सकाळी साडेदहा वाजता वीज चोरीविरुद्ध निरूळ गावात धडक मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेत त्यांना माणिक हिरामण पाटील, शिवाजी राधाकिसन पाटील, रामकृष्ण हिरामण पाटील, सुरेश गुलाबसिंग पाटील व संदीप योगराज पाटील हे पाच जण वीज चोरी करताना आढळून आले होते. या पाच जणांनी वर्षभरात दोन हजार 670 युनिट वीज चोरी केली. या सर्वांना 43 हजार 123 रुपयांचा दंड आकारून दंड भरण्यासाठीची नोटीस देण्यात आली मात्र या सर्वांनी गेल्या दोन वर्षात दंड अदा केला नाही. म्हणून या सर्व पाच जणांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात सोमवारी वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपासाकरिता हा गुन्हा रावेर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला.

