हरिपूरा ते वड्री रस्त्याच्या कडेला लपवलेले बेवारस सागवान लाकूड गस्ती पथकाकडून जप्त
यावल : हरिपूरा ते वड्री रस्त्याच्या कडेला लपवलेले बेवारस सागवान लाकूड गस्ती पथकाने केले जप्त केले. ही कारवाई शनिवारी रात्री करण्यात आली. 26 सागवान लाकडाच्या चौकटी पंचनामा करीत वनविभागाने यावल वनउपज केंद्रात जमा करण्यात आल्या. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
हरिपूरा ते वड्री रस्त्याने एका ठिकाणी रस्त्याच्या कडेला सागवान लाकूड लपवुन ठेवले असल्याची गुप्त माहिती वनविभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख व सहायक वनसरंक्षक प्रथमेश हाडपे यांना मिळाली होती. शनिवारी रात्री वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे, वनरक्षक सरला भोंगरे, वनरक्षक अश्रफ तडवी, वनरक्षक अक्षय रोकडे व वाहन चालक शरद पाटील, वनपाल सुधीर पटणे हे पथकासह या रस्त्यावर गेले व त्यांनी रस्त्याच्या कडेला तपासणी केली असता एका ठिकाणी सागवान लाकडाच्या 26 चौकटी मिळून आल्या. एकूण दहा हजार रुपये किंमतीचे 0.438 घनमीटर लाकूड जप्त करण्यात आले व जागेवर पंचनामा करीत हा संपुर्ण मुद्देमाल यावल येथील वन उपज केंद्रात जमा करण्यात आला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तपास वनपरीक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुधीर पटणे हे करीत आहे.

