निमगाव व आंबापाणी येथे शेतात काम करतांना महिलांना सर्पदंश

यावल : यावल तालुक्यातील निमगाव येथे शेतात काम करत असतांना 50 वर्षीय महिलेला तसेच आंबापाणी येथे देखील शेतात काम करणार्या 52 वर्षीय महिलेला सर्प दंश झाला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. दोघांना यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ आणल्यानंतर प्रथमोपचार करण्यात आले मात्र दोघांची प्रकृती गंभीर असल्याने दोघांना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले.
दोाघांची प्रकृती गंभीर
निमगाव, ता.यावल येथील सिंधुबाई प्रभाकर चौधरी (50) ही महिला शेतात काम करीत असताना त्यांच्या हाताला सापाने दंश केला. हा प्रकार निदर्शनास येताच त्यांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ आणण्यात आले. त्याचप्रमाणे आंबापाणी येथील शेत शिवारात गुलजारीबाई बारेला (52) यांनादेखील शेतात काम करताना डाव्या पायाला सापाने दंश केला. हा प्रकार निदर्शनास येताच त्यांना देखील यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत जावळे, डॉ.कोमल नरवाडे, परिचारिका ज्योत्स्ना निंबाळकर, सुमन राऊत, अमोल अडकमोल आदींनी त्यांच्यावर प्रथमोपचार केले. दोघांची प्रकृती गंभीर असल्याने दोघांना तातडीने पुढील उपचारार्थ जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आहे.
