धरणगावात बंद घर फोडले : सुदैवाने सराफा दुकानात टळली चोरी


धरणगाव (18 ऑगस्ट 2024) : शहरातील जैन गल्लीत चोरट्याने बंद घर फोडल्याने शहरात खळबळ उडाली तर सोनाराच्या दुकानात चोरीसाठी सलूनचे दुकानही फोडण्यात आले मात्र पोलिसांनी धाव घेतल्यामुळे चोरट्यांचा सराफ दुकान फोडण्याचा प्रयत्न फसला.

बंद घर चोरट्यांना आयतीच संधी
शहरातील जैन गल्लीत विवेक लाड हे आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. काही कामनिमित्त दोन दिवसापूर्वी ते मुंबई येथे गेले आहेत. घर बंद असल्याची संधी साधत पहाटे चार वाजेच्या सुमारास तोंडावर रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील सामान अस्तव्यस्त करत दागिने आणि रोकड शोधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, लाड हे बाहेरगावी असल्यामुळे घरातून नेमकी किती रक्कम व ऐवज चोरीस गेला, हे लाड हे धरणगावात परत आल्यावरच समजू शकणार आहे.

अज्ञात चोरट्यांनी जैन गल्लीतील विजय झुंजारराव यांचे सलूनचे दुकान फोडून त्यामार्गे सराफाचे दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न केला. पहाटे चार वाजेच्या सुमारास जैन गल्लीतील सुयश डहाळे यांनी चोरट्यांना बघितले. त्यांनी तात्काळ धरणगाव पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पीएसआय एस.के. पवार हे आपल्या सहकार्‍यांसोबत जैन गल्लीत पोहचले. पोलिसांना बघताच चोरट्यांनी पळ काढला. पीएसआय पवार यांनी सुभाष मराठे आणि मोहसीन खान या आपल्या सहकार्‍यांसोबत चोरट्यांचा गल्ली बोळातून सिनेस्टाईल पाठलाग केला मात्र अंधाराचा फायदा घेत चोरटे सोनवद रोडच्या दिशेने पसार होण्यात यशस्वी झाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !