मी नतमस्तक होऊन माफी मागतो : पंतप्रधान नरेंद्र मोदी

0

मुंबई (30 ऑगस्ट 2024) :  छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत त्यामुळे मी त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन शिवप्रेमींची जाहीर माफी मागतो, असे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असताना शुक्रवारी वाढवण येथे यासंबंधी पंतप्रधानांनी माफी मागितली.

मस्तक ठेवून माफी मागतो
पंतप्रधान म्हणाले की, आज मी माझे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांच्या पायावर मस्तक ठेवून माफी मागतो. आमचे संस्कार वेगळे आहेत. आम्ही वीर सावरकर यांचा अवमान करणारे, त्यांना शिवीगाळ करणारे लोक नाही. काही लोक सावरकरांना शिव्या घालूनही माफी मागत नाहीत. उलट ते या प्रकरणी न्यायालयात लढाई लढण्यास तयार होतात. देशाच्या एवढ्या महान सुपूत्राचा अपमान करुन ज्यांना पश्चाताप होत नाही. महाराष्ट्राच्या जनतेने त्यांचे संस्कार ओळखावेत. पण मी आज महाराष्ट्रात आल्यावर सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागण्याचे काम करत आहे.

प्रत्येक व्यक्तीची मी माफी मागतो
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज महत्त्वकांक्षी वाढवण बंदराचे भूमिपूजन झाले. यावेळी बोलताना त्यांनी या बंदराचे महत्त्व अधोरेखित करत त्याचा महाराष्ट्राच्या विकासाला मोठा लाभ होणार असल्याचे स्पष्ट केले. पण तत्पूर्वी, त्यांनी राजकोट येथील छत्रपती महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे निर्माण झालेल्या वादावर भाष्य करत झाल्याप्रकरणी जाहीर माफी मागितली. पंतप्रधान झाल्यावर सर्वप्रथम मी शिवरायांचे आशीर्वाद घेतले होते. जे लोक शिवरायांना मानतात, त्यांची पूजा करतात, अशा प्रत्येक व्यक्तीची मी माफी मागतो, असे ते म्हणाले.


कॉपी करू नका.