धुळे पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर : 173 रिक्षा, व्हॅन चालकांवर कारवाई

13 टवाळखोर, 48 पानटपरी चालकांवरही कारवाई: विद्यार्थी सुरक्षिततेसाठी विशेष मोहिम

0

धुळे (31 ऑगस्ट 2024) : धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या निर्देशानंतर पोलीस दलाने धडक मोहिम सुरू केली आहे. क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना वाहनात बसवून धोकेदायकपणे वाहतूक करणार्‍या जिल्ह्यातील तब्बल 173 रिक्षा व व्हॅन चालकांवर कारवाई करण्यात आली तर शालेय परिसरात फिरणारे 13 टवाळखोर, 48 पानटपरी चालकांवरदेखील कारवाई करीत गुन्हे दाखल करण्यात आले. याबरोबरच इतर मोटार वाहन कायद्याप्रमाणे 135 वाहनांवर कारवाई करीत त्यांच्याकडून 98 हजार 200 रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.

पोलिस यंत्रणा अलर्ट
बदलापूरच्या घटनेनंतर पोलिस यंत्रणा अलर्ट झाली आहे. जिल्हा पोलिस दलातर्फे जिल्हाभरातील शाळांना भेट दिली जात आहे. तसेच शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, तक्रार पेटी आहे का, शाळेला संरक्षण भिंत आहे का याची पाहणी केली जाते आहे. शाळेत नियुक्त कर्मचार्‍यांची चारित्र्य पडताळणी केली आहे का नाही याची माहिती घेण्यात येते आहे. जिल्ह्यातील सर्व 17 पोलिस ठाण्यात पोलिस दादा व दीदींची नियुक्ती केली असून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. शाळेसमोर टवाळखोरी करणार्‍यांसह पानटपरी चालकांवर कारवाई करण्यात आली. विद्यार्थी वाहतूक करणार्‍या रिक्षा चालकांकडे कागदपत्रांची तपासणी करण्यात येते आहे. दरम्यान, काही दिवसापूर्वी जिल्हाधिकार्‍यांनीही बैठक घेतली होती. तसेच सर्व शाळांची तपासणी करण्याची शिक्षण विभागातील अधिकार्‍यांना केली आहे.

नियमांचे पालन करा : पोलीस निरीक्षक
विद्यार्थी वाहतूक करणार्‍या रिक्षा चालकांसह व्हॅन चालकांनी विद्यार्थी वाहतूक करतांना वाहतूक नियमांचे उल्लंघण होणार नाही याची काळजी घ्यावी. वाहनाच्या क्षमतेनुसार विद्यार्थी वाहनात बसवावे. तसेच पालकांनीदेखील आपले पाल्य ज्या वाहनातून शाळेत जाते त्यावरील चालक वाहतूक नियमांचे पालन करीत आहे वा नाही याची खात्री करावी, असे आवाहन शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी केले आहे.

98 हजारावर दंड वसूल : 13 टवाळांवर कारवाई
पोलिसांनी विद्यार्थी वाहतूक करणार्‍या 173 वाहनांवर कारवाई केली. शाळेजवळ फिरणारे 13 टवाळखोर, 48 पानटपरी चालकासह मोटार वाहन कायद्यानुसार 135 जणांवर कारवाई झाली. 98 हजार 200 रुपयांचा दंड वसूल केला.

 


कॉपी करू नका.