रावेरातील घरफोडीची उकल : मध्यप्रदेशातील दोघांना बेड्या
79 हजारांचा मुद्देमाल जप्त : गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता
Ravera house burglary solved: Two from Madhya Pradesh in shackles रावेर (8 सप्टेंबर 2024) : रावेर शहरातील श्रीकृष्ण नगरात झालेल्या धाडसी घरफोडीचा गुन्हा रावेरातील गुन्हे शोध पथकाने उघडकीस आणला आहे. मध्यप्रदेशातील दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 79 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींच्या अटकेने आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. गोलुसिंग नसिबसिंग पटवा (20, पचौरी, ता.खकनार, ह.मु. ओझर बेडीपुरा मोहल्ला, ता.राजपुर, जि.बडवाणी) व सुनीलसिंग कैलाससिंग बरनाल (26, गंदवाणी, ता.धार, मध्यप्रदेश) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
रावेरात घरफोडीची उकल
रावेर शहरातील श्रीकृष्णनगर भागातील रहिवासी प्रवीण सीताराम महाजन हे 5 सप्टेंबर रोजी घर बंद करून कुसुंबा येथे गावी गेल्यानंतर बंद घर असल्याी संधी चोरट्यांनी साधली होती. घरातील पत्री कपाटातील सोने व चांदीचे दागिने मिळून 22 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला होता. प्रवीण महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. रावेरचे पोलीस निरीक्षक विशाल जयस्वाल यांनी गुन्हे शोध पथकाला गुन्हे उघडकीस आणण्याची सूचना दिल्यानंतर पथकाने त्या भागातील सीसीटीव्ही तपासले. तसेच रावेर-सावदा रोडवर एका पेट्रोल पंपानजीक गोलूसिंग व सुनीलसिंग हे संशयास्पद फिरत असताना त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची विचारपूस केली असता त्यांनी घरफोडीची कबुली दिली.

दुचाकीसह मुद्देमाल 79 हजारांचा मुद्देमाल जप्त
आरोपींना बोलते केल्यानंतर त्यांनी चोरी केलेली तीन हजार रुपये किंमतीची पैंजण काढून दिली तसेच 75 रुपये किंमतीची एक होंडा कंपनीची दुचाकी, लहान स्क्रू ड्रायव्हर, मोठा स्क्रू ड्रायव्हर, लहान बॅटरी (टार्च), एक लोखंडी पोपटी पान्हा असा एकूण 78 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यांनी उघडकीस आणला गुन्हा
जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, फैजपूर उपविभागीय सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपुर्णा सिंग, रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील, पोलीस उपनिरीक्षक धनश्याम तांबे, हवालदार ईश्वर चव्हाण, कॉन्स्टेबल सचिन घुगे, सुकेश तडवी, प्रमोद पाटील, विकारोद्दीन शेख, अमोल जाधव, विशाल पाटील, महेश मोगरे आदींच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.
