बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीचा इन्काउंटर
पोलिसाच्या ताब्यातील बंदुकी हिसकावल्यानंतर पोलिसांनी केला गोळीबार
Encounter of accused in Badlapur Atrocities case ठाणे (23 सप्टेंबर 2024) : बदलापूरातील अत्याचाराच्या घटनेने समाजमन संतप्त झाले होते. या घटनेतील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. आरोपी अक्षयला पोलिसांच्या जीपमधून नेत असताना अक्षयने पोलिसांची रिव्हॉल्व्हर हिसकावली आणि पोलिसांनी प्रत्युत्तर देत गोळीबार केल्यानंतर अक्षय शिंदेचा मृत्यू झाला.
दोन विद्यार्थिनींवर अत्याचार
बदलापूरातील एका शाळेतील दोन अल्पवयीन बालिकांवर आरोपी अक्षयने अत्याचार केला होता. स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) चौकशीदरम्यान शिंदेने त्याचा जबाब कॅमेर्यासमोर नोंदविला असून हा व्हिडीओ कोर्टात सादर करण्यात आला. बदलापुरातील शाळेत दोन चिमुकलींवरील झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणात एसआयटीने दोन स्वतंत्र आरोपपत्र न्यायालयात सादर केली होती. दोन्ही विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याची कबुली त्याने दिली. डॉक्टर आणि पोलिसांसमोर या कबुलीजबाबाचे चित्रीकरणही झाले.

अशी घडली घटना
अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षयला सोमवारी तळोजा कारागृहातून रिमांडसाठी नेत असताना संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास मुंब्रा बायपास इथे अक्षयने एपीआय निलेश मोरे यांची रिव्हॉल्व्हर हिसकावली. यावेळी त्याने पोलिसांवरच तीन राऊंड फायर केले. पोलिसांनी लगेच प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. अक्षयच्या डोक्याला एक गोळी लागली, तर दुसरी शरीरावर लागली. त्याला तातडीने कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
