मराठी भाषा समृद्धीसाठी श्रवण ,आकलन, वाचन आणि लेखन करणे गरजेचे : डॉ. शरद अग्रवाल
भुसावळ (29 जानेवारी 2025) : मराठी भाषा सर्वांनी बोलणे अनिवार्य आहे. घरात, बाजारात, महाविद्यालयात वावरत असताना प्रत्येकाने जाणीवपूर्वक मराठी भाषेतच बोललं पाहिजे त्यामुळे मराठीचा प्रचार व प्रसार होईल. आपले ज्ञान वाढवायचे असेल कुसुमाग्रज, पु. ल. देशपांडे, चिं.वी. जोशी, महानोर, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ आदींची पुस्तके वाचली पाहिजे. नुसते वाचून मराठी समृद्ध होणार नाही तर आपण मराठीत लेखन सुद्धा केले पाहिजे यातूनच मराठी भाषा समृद्ध होईल, असा अशावाद डॉ. शरद अग्रवाल यांनी व्यक्त केला.
श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ.जान्हवी तळेगावकर होत्या.
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त काव्यवाचन स्पर्धा झाली. कवी वि.वा.शिरवाडकर यांची ‘मराठी माती’ कविता रामेश्वरी नारायण सोनवणे, संदीप खरे यांची ‘नसतेस घरी तू जेव्हा’ खुशी टाक, विंदा करंदीकर यांची ‘आयुष्याला द्यावे उत्तर’ ही कविता अर्पिता तायडे तर ज्योती सावकारे व दीपाली सोनवणे हिने ‘हीच आमची प्रार्थना’ ही कविता सादर केले. धनश्री भोईने स्वलिखित मराठी ‘भाषा महाराष्ट्राची राणी’ ही कविता सादर केली. दीक्षा गजरेने मराठी चारोळी सादर केली.
सेजल पाटील हिने ‘माझी मराठी’ या कवितेचे सादरीकरण केले. प्रास्ताविक प्रा.विनोद भालेराव यांनी केले. धनश्री कोळीने सूत्रसंचालन तर आभार प्रदर्शन प्रा.भावना संकोपाळ यांनी मानले. प्रा.निलेश गुरुचल, डॉ.गिरीश कोळी, प्रा.गिरीश सरोदे, प्रा.करण भालेराव, प्रा.सना खान, प्रा.हेमांगी कोळी, प्रा.किरण खेट्टे, नितीन चौधरी यांनी परिश्रम घेतले.






