मुंजोबा महाराजांचा जयघोष : अट्रावलला दर्शनार्थ गर्दी
यावल (2 फेब्रुवारी 2025) : ‘मुंजोबा महाराज की जय’ च्या जयघोषात तालुक्यातील अट्रावल येथील प्रसिध्द जागृत मुंजोबा देवस्थानावर शनिवारच्या पहिल्याचं ‘वाराला’ (यात्रेत) राज्यभरातुन हजारो भाविकांनी दर्शन घेतले. शेकडो कुटूंबाकडून येथे नवस फेडण्यात आले. डिजेच्या युगात आज ही अट्रावलमध्ये डफाच्या गजरात बालकांना नवस फेडण्यास निघालेल्या मिरवणुकांनी लक्ष वेधले. सकाळपासूनचं नवस फेडणार्यांनी विविध शेतात आपापला नैवेद्य व महाप्रसाद तयार करण्याची लगबग सुरू होती.
300 वर्षांपूर्वी स्थापना
अट्रावल येथे भालोद रस्त्यावर श्री क्षेत्र मुंजोबा मंदिर आहे. या मुंजोबा मंदिराचे निर्माण व यात्रेची परंपरा सुमारे 300 वर्षापुर्वीची असल्याचे भाविक व जाणकार सांगतात. मंदिर जागृत असून भाविकांनी मागितलेले मागणे पूर्ण होते अशी भाविकांची श्रध्दा आहे. दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील शनिवार व सोमवारी अशा दोन दिवस चार वेळेस ही यात्रा भरते. यात्रेस मुंजोबाचे ‘वार’ असे संबोधले जाते. या वर्षीच्या यात्रेस शनिवारपासून मोठ्या उत्साहात सुरवात झाली. पहिल्या वाराला (यात्रेस) राज्यभरातून हजारो भाविकांनी येथे दर्शनाकरीता हजेरी लावली.

शेकडो भाविकांनी फेडले नवस
शेकडोंच्या संख्येत भाविकांनी आप आपल्या बाल-गोपालांचे नवस फेडले. त्यात लहान मुलांचे जाऊळ काढणे तसेच विविध प्रकारच्या बालकांच्या तुला करण्यात आल्या व वरण, भाजलेल्या बट्टीचे (लोडगे) नैवेद्य मुंजोबांना दाखवण्यात आले. मुंजोबास दही, भात, लोणी, यांचा देखील अनेकांनी नैवेद्य सादर केला. नवसाला पावणारा मुंजोबा देवस्थान म्हणूनच या मंदिराची ख्याती जिल्हाभरात आहे. मंदिर समितीकडून यंदा रंगरंगोटी सह मंदिरावर केलेली भव्य रोशणाई लक्ष वेधत आहे. फैजपूर उपविभागीय कार्यालयाच्या सहायक पोलीस अधीक्षक अन्नपुर्णा सिंग, यावलचेे पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर, फैजपूरचे सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे, पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरेसह पोलिसांनी चोेख बंदोबस्त ठेवला.






