आक्रमणांना समर्थपणे तोंड देणे ही संघ स्वयंसेवकांची जबाबदारी : भैयाजी जोशी
यावल (10 फेब्रुवारी 2025) : सद्यस्थितीत विविध स्वरूपाची आक्रमणे आपल्या देश, धर्म, संस्कृतीवर होत आहेत. या आक्रमणांना समर्थपणे तोंड देणे ही संघ स्वयंसेवकांची जबाबदारी आहे. पुढील काळात जागरण, संस्कार आणि कुटुंब प्रबोधन या क्षेत्रात काम वाढवावे, असा संदेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी दिला. ‘स्नेहबंध’ या संघ कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. गोविज्ञान अनुसंधान व बहुउद्देशीय संस्था, हरिपुरा, ता.यावल येथे बापूराव मांडे यांच्या प्रयत्नातून इच्छापूर्ती गोशाळेच्या प्रांगणामध्ये संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील 1975 ते 1990 या काळातील कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून भैय्याजी जोशी बोलत होते.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर धर्म जागरणचे अखिल भारतीय प्रमुख शरद रावजी ढोले, पश्चिम प्रांत संघचालक नाना जाधव, पश्चिम क्षेत्र क्षेत्र कार्यवाह बाळासाहेब चौधरी, भुसावळ जिल्हा संघचालक डॉ.विजय सोनी, ज्येष्ठ स्वयंसेवक बापूराव मांडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला इच्छापूर्ती गोमाता मंदिराचे उद्घाटन झाले. उपस्थित मान्यवर तसेच संघाचे आजी-माजी प्रचारक यांचा गोमातेची प्रतिमा, शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

ज्येष्ठ कार्यकर्ते, अधिकारी बाळासाहेब चौधरी, रमेश बापू महाजन, भाऊराव पाटील, जगदीश ठाकूर, अरुण जोशी, शिवलकर, अशोक कांडेलकर, शशी गाजरे इत्यादींनी गतकाळातील स्मृतींना उजाळा दिला. प्रास्ताविक बापूराव मांडे तर सूत्रसंचालन विनोद उबाळे यांनी तर आभार सोनू मांडे यांनी मानले. जिल्हाभरातून आणि जिल्हा बाहेरील साधारणतः 250 कार्यकर्त्यांची उपस्थिती दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गो शाळेच्या कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.






