भुसावळ तालुक्यात गावठाण शेतरस्ता अखेर मोकळा : महसूल प्रशासनाची प्रभावी कारवाई


भुसावळ (30 जुलै 2025) : वरणगाव महसूल मंडळांतर्गत मौजे सावतर-निंभोरा खुर्द गावातील अनेक वर्षांपासून अतिक्रमणामुळे बंद झालेला गावठाण शेतरस्ता अखेर मोकळा करण्यात महसूल प्रशासनाला यश आले. तहसीलदार निता लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मंडळ अधिकारी रजनी तायडे यांच्या नेतृत्वाखाली ही विशेष मोहीम महसूल कर्मचार्‍यांनी राबविली.

या शेतरस्त्याच्या बंद अवस्थेमुळे गावातील अनेक शेतकरी वर्षानुवर्षे त्रस्त होते.

शेतकर्‍यांना मोठा दिलासा
शेतीसाठी जाण्या-येण्याचा मार्ग बंद असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. शेवटी शेतकर्‍यांनी तहसील कार्यालयात अर्ज सादर करून रस्ता मोकळा करून देण्याची मागणी केली होती. त्यानंतर मंडळ अधिकारी तायडे यांनी स्वतः स्थळ पाहणी केली व शेतकरी बैठकीत रस्त्यावरील अडथळ्यांचा आढावा घेतला. या बैठकीस भुमी अभिलेख कार्यालयाचे कर्मचारी, पोलीस प्रशासन, तलाठी मनिषा बर्डीया, कोतवाल सुरेश कोळी, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील तसेच गावातील शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी काही शेतकर्‍यांनी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मात्र शासन निर्णय स्पष्ट करत शांततेत व कायदेशीर मार्गाने समजूत काढली.

शासन निर्णया नुसार गावठाणातील शेतरस्ते अतिक्रमणमुक्त ठेवणे बंधनकारक असल्याने भुमी अभिलेख विभागाने 12 फूट रुंदीच्या शेतरस्त्याची अचूक मोजणी केली. त्यानंतर जेसीबीच्या साहाय्याने झाडे, झुडपे हटविण्यात आले आणि ट्रॅक्टर व बैलगाड्यांमार्फत रस्ता लेव्हल करण्यात आला. या कार्यवाहीत शेतरस्ता मोकळा झाल्याने गावकर्‍यांनी समाधान व्यक्त केले.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !