भुसावळजवळील कंडारी, आयुध निर्माणी, मिलीटरी स्टेशन भागात पाच बिबट्याच्या संचार !
Five leopards spotted in Kandari, Ordnance Factory, Military Station areas near Bhusawal! भुसावळ (12 ऑगस्ट 2025) : कंडारी परिसर, मिलीटरी स्टेशन, आयुध निर्माणी इस्टेट परिसरात गेल्या सात महिन्यांपासून बिबट्याचा वापर आहे. सुरुवातीला एक बिबट्या आढळला मात्र या परिसरात एकदोन नव्हे तर चार ते पाच बिबट्यांचा अधिवास असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. दुसरीकडे भुसावळ मिलीटरी स्टेशन व कंडारीचे पोलिस पाटील रामा तायडे यांनी वनविभागाकडे सातत्याने तक्रार करुनही पिंजरे लावले गेले नाही. आयुध निर्माणीतही बिबट्याचा अधिवास असल्याची ओरड कर्मचार्यांमध्ये असल्याने तब्बल 25 हजार लोकसंख्येचा हा भाग सध्या दहशतीखाली आहे. वनविभाग या परिसरात कोणावर हल्ला होण्याची वाट बघतो आहे काय? असा प्रश्नही या परिसरात उपलब्ध होत आहे.
नाशिकच्या घटनेनंतर तरी पवित्रा घ्या
नाशिक जिल्ह्यातील वडनेरमधील दिंडोरी शिवारात एका 65 वर्षीय महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. तर रक्षाबंधनाच्या दिवशीच नाशिकच्या वडनेरमधील तीन वर्षाच्या बालकावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात चिमुरड्याचा मृत्यू झाला. या हल्ल्याच्या पाश्वभुमीवर वनविभागाने सावध पवित्रा घेवून उपाययोजना करणे आवश्यक आहे.
वनविभागाची धडक कारवाई शून्य
28 जानेवारीला सर्वांत आधी मिलीटरी पेट्रोलिंग करणार्या जवानांना बिबट्याचे दर्शन झाले होते. यानंतर वारंवार बिबट्याचा अधिवास या भागात आढळून आला. गेल्या सात महिन्यांपासून बिबट्याचा संचार कायम असला तरी वनविभाग मात्र ट्रॅप कॅमेरे लावण्याच्या पलिकडे जावून धडक उपाययोजना करण्यास तयार नाही.
या भागात अधिवास का?
तापी काठावर वसलेल्या कंडारी गावाच्या परिसरात तापी खोर्यात दाट झाडोरा आहे. आयुध निर्माणी, मिलीटरी स्टेशन, केंद्रीय विद्यालय परिसर या भागातही झुडूपांची संख्या अधिक आहे. याच परिसरात तापीनदीमुळे पाणी तसेच दाट बाभुळवनांमुळे बिबट्यासाठी विपूल प्रमाणात खाद्य आहे. यामुळे या परिसरात बिबट्याचा अधिवास असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
पिंजरा लावण्यासाठी अडचणी
वन विभागाच्या नियमांनुसार बिबट्या एखाद्या घरात, विहिरीत अडकला असेल तर रेस्क्यु करण्यासाठी पिंजरा बसवता येतो. यासाठी देखील नागपूर येथील वनविभागाकडून परवानगी घ्यावी लागते. अशा नियमांवर बोट ठेवून वनविभाग पिंजरा बसविण्याकडे दूर्लक्ष करीत आहे. मात्र या भागातील नागरिकांनी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी केली आहे.