साकेगावात श्री स्वामिनारायण गुरुकुलमध्ये विज्ञान प्रदर्शन
विद्यार्थ्यांनी कायम प्रयोगशील राहून वैज्ञानिक कल्पकतेने ज्ञान मिळवावे : प्राचार्य डॉ.खंडारे
Science exhibition at Sree Swaminarayan Gurukul in Sakegaon भुसावळ (17 डिसेंबर 2025) : साकेगावातील श्री स्वामिनारायण गुरुकुल विद्यालयात बुधवार, 17 रोजी विज्ञान प्रदर्शन झाले. अध्यक्षस्थानी नवोदय विद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.आर.खंडारे होते.
यांची होती उपस्थिती
प्रमुख अतिथी म्हणून भगवान अर्जुन इंगळे, संस्था सदस्य गणेश फेगडे, गुरुकुल संस्थेचे संचालक गोपाळ भगत, नवोदय विद्यालयाचे सतीश कुमार, बिना कुमारी उपस्थित होत्या. मुख्याध्यापक मनोज भोसले, अभिष सरोदे, मुख्याध्यापिका प्रणिता चौधरी, उज्वला धांडे तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.




या विज्ञान प्रदर्शनात शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेतून व परिश्रमातून तयार केलेले विविध कार्यरत नमुने व वैज्ञानिक उपकरणे व उपक्रमावर आधारित प्रयोग सादर केले. ऊर्जा संवर्धन, पर्यावरण संरक्षण, आधुनिक तंत्रज्ञान, आरोग्य तसेच दैनंदिन जीवनाशी निगडित विज्ञान विषयावरील प्रकल्प उपस्थितांचे विशेष आकर्षण ठरले. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे व सामाजिक जाणीवेचे उत्कृष्ट प्रत्यय देणारे विशेष उपकरणे लक्षवेधी ठरले.
जसे सांडपाण्याच्या पुनर्वापरावर आधारित प्रकल्पांद्वारे पाणी शुद्धीकरण प्रक्रिया व पाणी संवर्धनाचे महत्त्व प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी विकसीत केलेली आधुनिक व स्वयंचलित कचरापेटी ही पर्यावरण पूरक संकल्पनेवर आधारित असून स्वच्छता, कचर्याचे योग्य वर्गीकरण व आधुनिक तंत्रज्ञानाचा समन्वय दर्शवणारी ठरली. अशा अनेक प्रकल्पांमधून विद्यार्थ्यांची नाविन्यपूर्ण दृष्टी, पर्यावरणाबाबतची जबाबदारी स्पष्टपणे दिसून आली.
विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक कार्यरत प्रकल्प प्रत्यक्ष चालू करून त्यामागील वैज्ञानिक तत्वे सविस्तर समजावून सांगितली.कार्यक्रमाचे अध्यक्ष खंडारे यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना विज्ञानातील संशोधन, पर्यावरण संवर्धन व नवकल्पनांचे महत्त्व पटवून देत मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांमुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन व आत्मविश्वास वाढीस लागण्यास निश्चितच हातभार लागला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका स्वाती भंगाळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.