उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा : नोकरदारांना 180 दिवसांची प्रसुती रजा
मुंबई (10 मार्च 2026) : राज्याच्या नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधिमंडळात महिलांसाठी महत्त्वाची घोषणा केली असून आता नोकरदार महिलांना 180 दिवसांची प्रसुती रजा मिळणार आहे शिवाय विधानसभेतील पहिल्याच भाषणात त्यांनी महिला कर्मचार्यांसाठी लवकर या, लवकर जा, ही योजना लागू करण्याचा निर्णय जाहीर केला. या घोषणेमुळे मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय कार्यालयांमध्ये काम करणार्या महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.
काय आहे नेमकी योजना ?
सुनेत्रा पवार यांनी सांगितले की, या नव्या योजनेनुसार मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचारी सकाळी 9.15 वाजता कार्यालयात उपस्थित झाल्यास त्यांना संध्याकाळी अर्धा तास आधी घरी जाण्याची परवानगी दिली जाईल. महिला कर्मचार्यांना कुटुंब आणि नोकरी यांचा समतोल राखता यावा, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांसाठी कठोर कायदा येणार
यावेळी त्यांनी सरकारने महिलांसाठी राबवलेल्या विविध योजनांचाही उल्लेख केला. लाडकी बहीण, लेक लाडकी आणि अन्नपूर्णा, यांसारख्या योजना राज्य सरकारने सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले तसेच ऑनलाईन माध्यमांतून होणार्या आर्थिक फसवणुकीच्या घटनांवर नियंत्रण आणण्यासाठी कठोर कायदा करण्याबाबतही सरकार विचार करत असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यातील सुमारे 17 हजार अंगणवाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहितीही त्यांनी सभागृहात दिली.
नोकरदार महिलांना 180 दिवसांची प्रसूती रजा मिळणार
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधानपरिषदेत नोकरदार महिलांना केंद्र सरकारच्या धर्तीवर 180 दिवसांची प्रसूती रजा मंजूर करण्यात आल्याची घोषणा केली. प्रसूती रजेनंतर गरज भासल्यास एक वर्षापर्यंत वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय देय अर्धवेतन रजा देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. मातृत्वाचा सन्मान राखत महिलांना कुटुंब व सेवेत समतोल साधता यावा हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या.







