तुकाराम मुंढेंच्या विभागाचा दणका : जळगावात दोन तर भुसावळातील एका हॉटेल्सचा परवाना निलंबित


Crackdown by Tukaram Mundhe’s department: Licenses of two hotels in Jalgaon and one in Bhusawal suspended जळगाव (4 जुलै 2026) : अन्न व औषध प्रशासनाची धूरा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वीकारल्यानंतर राज्यात धडक कारवाईला सुरूवात झाली आहे. यापूर्वी भेसळीविरोधात कारवाई झाल्यानंतर आता या विभागाने हॉटेल्सकडे मोर्चा वळवला असून जळगावात दोन तर भुसावळात एका हॉटेलवर कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. नागरिकांनी एफडीएच्या कारवाईचे कौतुक केले असून शहरातील हॉटेल्सची कसून तपासणी करण्याची मागणी केली आहे शिवाय उघड्यावर विक्री होणार्‍या वडेपाव, समोसे, कचोरी तसेच अन्य पदार्थ विक्रीच्या गाड्यांवरही कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

नियम धाब्यावर बसवून व्यवसाय
अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने अचानक केलेल्या तपासणीदरम्यान अनेक हॉटेल्समध्ये अन्न सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर त्रुटी आढळून आल्या. स्वयंपाकघरात मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता, निकृष्ट दर्जाची कोल्ड स्टोरेज व्यवस्था, उघड्यावर ठेवलेले कच्चे अन्न, शिजविलेले आणि कच्चे अन्न एकत्र साठविणे, कालबाह्य अथवा लेबलविरहित साहित्याचा वापर, तसेच स्वच्छतेच्या मूलभूत नियमांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे चित्र तपासणीदरम्यान समोर आले.

अनेक कर्मचार्‍यांनी हातमोजे, हेडकॅप किंवा अ‍ॅप्रनचा वापर केला नसल्याचेही अधिकार्‍यांच्या निदर्शनास आले. याशिवाय कर्मचार्‍यांची नियमित वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली नसणे, आवश्यक नोंदी व कागदपत्रे उपलब्ध नसणे, ग्राहकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी कोणतीही व्यवस्था नसणे आणि अन्न हाताळणीबाबत आवश्यक प्रशिक्षणाचा अभाव अशा अनेक त्रृटीही आढळल्या.

परवाना नसलेल्यांवर देखील कारवाई
तपासणीदरम्यान चार अन्न आस्थापनांकडे वैध अन्न व्यवसाय नोंदणी अथवा परवाना नसल्याचे उघड झाले. परवाना नसताना अन्न व्यवसाय सुरू असल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित आस्थापनांना वैध नोंदणी अथवा परवाना मिळेपर्यंत व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्याचे लेखी आदेश देण्यात आले. नियमांचे पालन केल्याशिवाय या आस्थापनांना व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या मोहिमेत जळगाव शहरातील अजिंठा रोड, एमआयडीसी परिसरातील हॉटेल त्रिमूर्ती आणि हॉटेल भानू या दोन हॉटेल्सचे परवाने निलंबित करण्यात आले तसेच भुसावळ तालुक्यातील साकेगाव शिवारातील एका हॉटेलवरही नियमानुसार कारवाई करण्यात आली आहे.

नियमभंग करणार्‍यांवर कारवाई सुरूच
अन्न व औषध प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍या अन्न व्यावसायिकांविरुद्ध यापुढेही अशाच धडक कारवाया सुरू राहतील. नाशिक विभागात सुरू करण्यात आलेली ही विशेष मोहीम आगामी काळात अधिक व्यापक करण्यात येणार असून, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे, मिठाई दुकाने, बेकरी तसेच अन्य अन्न आस्थापनांची नियमित आणि अचानक तपासणी केली जाणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे त्यामुळे अन्न व्यावसायिकांनी अन्नसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

उघड्यावर अन्न पदार्थ विक्री करणार्‍यांवरही व्हावी कारवाई
भुसावळ शहराच्या चौफेर मोठ्या प्रमाणावर लोटगाड्यांवर वडापाव, कचोरी, समोसे तसेच तेलात तळलेल्या पदार्थांची विक्री होते मात्र हे खाद्यपदार्थ न्यूजपेपरद्वारे ग्राहकांना विक्री केले जातात त्यामुळे ग्राहकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे शिवाय स्वच्छतेची काळजी घेतली जात नसल्याचे चित्र आहे. या अनुषंगाने शहरात धडक मोहिम राबवावी, अशी अपेक्षा सुज्ञ नागरिक व्यक्त करीत आहे. विभागाकडून धडक मोहिम राबवून कारवाई केली जाणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !