भुसावळात हवालदारासाठी 20 हजारांची लाच मागणार्‍या खाजगी पंटराला बेड्या

हवालदार महेश चौधरीचा कसून शोध : एसीबीच्या कारवाईने पोलीस वर्तुळात खळबळ


गणेश वाघ
भुसावळ (मंगळवार, 29 सप्टेंबर 2026) : भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात चौघांवरील अटकेची कारवाई टाळण्यासाठी एक लाखांची लाच मागून सुरूवातीला 50 हजार रुपये स्वीकारणार्‍या व नंतर 50 हजारांची लाच मागून 20 हजारात तडजोड करणार्‍या खाजगी पंटराला जळगाव एसीबीने मंगळवारी दुपारी अटक केली. अमन जसबिंदर सनसोये (36, दीपनगर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीने भुसावळ तालुका पोलीस ठाण्यातील हवालदार महेश चौधरी यांच्यासाठी लाच मागितल्याचे एसीबीने अहवालात म्हटले आहे तर अटकेच्या भीतीने पोलीस कर्मचारी पसार झाल्याचे एसीबीने सांगितले.

असे आहे लाच प्रकरण
एसीबीच्या प्रेस नोटनुसार, भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात हवालदार महेश चौधरी हे कार्यरत आहेत. गुरनं.139/2026, भारतीय न्याय संस्था कलम 331 (3) अन्वये तक्रारदारासह अन्य तिघांविरोधात गुन्हा दाखल असून या गुन्ह्यात अटक करण्याची भीती हवालदार चौधरी यांनी दाखवली व कारवाई टाळण्यासाठी एक लाखांची लाच मागून त्यावेळी 50 हजारांची लाच स्वीकारल्याचा आरोप आहे. त्यानंतर उर्वरीत 50 हजारांसाठी तगादा लावल्यानंतर तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे 3 ऑगस्ट 2026 रोजी तक्रार नोंदवली.

संशय आल्याने टळला सापळा
एसीबीने तक्रार आल्यानंतर लाच पडताळणी केली असता 20 हजारांची लाच खाजगी पंटराने हवालदार चौधीर यांच्यासाठी मागितल्याचे निष्पन्न झाले. एसीबीच्या पथकाने ठरल्याप्रमाणे शहरात 3 ऑगस्ट 2026 रोजी सापळा रचला मात्र यावेळी कर्मचार्‍याला संशय आल्याने लाच स्वीकारण्यात आली नाही मात्र एसीबीच्या पडताळणीत पंटराच्या माध्यमातून लाच मागणी स्पष्ट झाली व त्याचा अहवाल एसीबीला येताच मंगळवारी एसीबीने खाजगी पंटर अमन सनसोयेला बेड्या ठोकल्या. लाच प्रकरणात हवालदार महेश चौधरीचा सहभाग आढळल्यानंतर त्याचा एसीबीने मंगळवारी शोध सुरू केला मात्र तो आढळला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

यांनी केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, ग्रेडेड उपनिरीक्षक सुरेश पाटील, हवालदार बाळू मराठे, कॉन्स्टेबल प्रणेश ठाकूर, कॉन्स्टेबल सचिन चाटे, कॉन्स्टेबल राकेश दुसाने आदींनी हा सापळा यशस्वी केला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !