भुसावळात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समितीसह शहर विकास आघाडीचा भारत बंदला पाठिंबा : भुसावळ व्यापारी असोसिएशनचाही आंदोलनाला पाठिंबा : वंचित बहुजन आघाडीची निदर्शने
भुसावळ : केंद्र सरकारचे तीन काळे कायदे रद्द करण्यासाठी 8 डिसेंबर रोजी भारत बंदची हाक देण्यात आल्यानंतर भुसावळातही बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. भुसावळ शहर व्यापारी असोसिएशननेदेखील बंदला पाठिंबा दर्शवल्याने शहरातील व्यापारी पेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली आहे. भुसावळातील कृउबा समितीसह भुसावळ शहर महाविकास आघाडी तसेच वरणगावातील महाविकास आघाडीने पाठिंबा दर्शवला आहे. बंदच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकार्यांनी प्रांत कार्यालयाबाहेर निदर्शने करीत प्रशासनाला निवेदन दिले.
भारत बंदला महाविकास आघाडीचा पाठींबा
वरणगाव : केंद्र सरकारने आणलेल्या नवीन कायद्याच्या विरोधात पंजाब, हिरयाणा, चंदीगढ यासह देशभरातील शेतकर्यांनी दिल्लीच्या सीमेवर 10 दिवसांपासून शेतकर्यांना न्याय मिळावा यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू केले आहे. केंद्र सरकार शेतकर्यांच्या समस्या जाणून घेण्याऐवजी हे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे या विरोधात शेतकर्यांनी पुकारलेल्या भारत बंदला महाविकास आघाडीच्या वतीने पाठिंबा दर्शवण्यात आला आहे. याबाबतच्या निवेदनावर राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दीपक मराठे, काँग्रेस आयचे तालुकाध्यक्ष पंकज पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख समाधान महाजन, शिवसेना शहर प्रमुख रवींद्र सुतार, राष्ट्रवादी शहराध्यक्ष संतोष माळी, काँग्रेसचे शहराध्यक्ष अशफाक काझी यांच्या स्वाक्षर्या आहेत.

भुसावळ कृउबा बंद
भुसावळ : राजधानीतील आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी भुसावळ कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळवारी बंद ठेवण्यात आली. मंगळवारी कृउबातील सर्व प्रकारचे लिलाव व त्याच्याशी संबंधीत असलेले सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले असल्याचे कृउबा सभापती सचिन चौधरी म्हणाले.
भुसावळ शहर महाविकास आघाडीचा पाठिंबा
भुसावळ : मंगळवारच्या भारत बंदला भुसावळ शहर महाविकास आघाडीने पाठिंबा दर्शवला आहे. केंद्र सरकारने शेतकरी विरोधी आणलेल्या काळ्या कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये शेतकरी बांधवांसह व्यापारी, उद्योजक, दुकानदार, लहान दुकानदार, शेतमजूर, टपरीधारक व कामगारांनी एक दिवसीय व्यवसाय बंद ठेवून आंदोलनात सहकार्य करावे, असे आवाहन शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष रवींद्र निकम, राष्ट्रवादी शहराध्यक्ष नितीन धांडे, शहर शिवसेना अध्यक्ष बबलू बर्हाटे यांनी केले आहे.
पोलिसांकडून फिक्स पॉईंट व गस्त
पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे म्हणाले की, भारत बंदच्या पार्श्वभूमीवर चारही पोलिस ठाणे हद्दीत अधिकार्यांसह कर्मचार्यांची पेट्रोलिंग असेल शिवाय फिक्स पॉईंटही लावण्यात आले आहेत.

