छडवेल कोर्डेनजीक हॉटेलवर छापा : 65 लाखांचा मद्य साठा जप्त
नंदुरबार : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक येथील भरारी पथकाने छडवेल कोर्डेच्या नवरंग हॉटेलवर छापा टाकून सुमारे 65 लाख 30 हजार रुपये किंमतीचा मद्यसाठा जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. एका खेडेगावात एवढ्या मोठ्या रकमेचा दारू साठा आढळून आल्याने गुजरात राज्यात दारू पुरवठा करणारी एक मोठी साखळी कार्यरत असण्याची शक्यता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने व्यक्त केली आहे. ही कारवाई छडवेल येथे झाली मात्र यातील संशयीत आरोपी हा शहादा तालुक्यातील अनकवाडे येथील मुकेश अरुण चौधरी असून त्याच्याविरुद्ध याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त कांतीलाल अमाप, दक्षता विभागाच्या संचालक उषा वर्मा यांना नवरंग हॉटेल मध्ये मोठा दारू साठा असल्याची माहिती मिळाली होती, त्यानुसार पथक तयार करून ही कारवाई करण्यात आली. छडवेल ते आमखेल रस्त्यावर असलेल्या शेडमधील हॉटेल नवरंग मध्ये छापा टाकण्यात आला. यावेळी तेथे गोवा, मध्यप्रदेश बनावटीचा सुमारे 65 लाख 30 हजार रुपये किंमतीचा दारू साठा आढळून आला. हा दारू साठा भरण्यासाठी ट्रका मागविण्यात आल्या होत्या. या प्रकरणी शहादा तालुक्यातील मुकेश चौधरी नामक व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.


