श्री संत गाडगेबाबा रुग्णालयात शवविच्छेदन सुविधा सुरू करावी
भाजपा वैद्यकीय आघाडी उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ.नि.तु.पाटील यांची मागणी
भुसावळ : भुसावळ पालिकेच्या श्री संत गाडगेबाबा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी कक्ष उपलब्ध असून तेथे शवविच्छेदनाची सुविधा सुरू करावी, अशी मागणी भाजपा वैद्यकीय आघाडी उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ.नि.तु.पाटील यांची मागणी जिल्हा आरोग्य प्रशासनाकडे केली आहे. निवेदनाचा आशय असा की, भुसावळ ग्रामीण रुग्णालय आणि ट्रामा केअर सेंटरमध्ये सध्या केवळ प्रसुतीगृह सुरू असून काही दिवसांपूर्वी क्ष किरण तपासणी यंत्रणा उपलब्ध झाली असून येथे शवविच्छेदनासाठी खोली बांधण्याचा प्रस्ताव प्रगतीपथावर असून तो पर्यंत पालिका रुग्णालयात शवविच्छेदनाची सुविधा सुरू केल्यास मृताच्या नातेवाईकांसह पोलिस प्रशासनावरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
अपघाताचे प्रमाण वाढले
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक असलेल्या भुसावळ शहरात हल्ली अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अपघातात मयत झालेल्या व्यक्तीवर शवविच्छेदन करावयाचे म्हटल्यास मृतदेह वरणगाव येथे हलवावा लागतो. या प्रक्रियेत वेळेसह पैशांचा अपव्यय होतो मात्र भुसावळ तालुका असतानाही स्थानिक स्तरावर शवविच्छेदनाची सुविधा नाही. भुसावळ शहरात तीन पोलिस ठाणे, दोन ऑर्डनन्स फॅक्टरी, जंक्शन स्थानक व तालुक्यातील लागून 36 खेडी आहेत शिवाय महामार्ग चौपदरीकरणाचे काम हल्ली सुरू आहे. शहराच्या वाढत्या विस्तारासोबत महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले असून अपघातात इसम मयत झाल्यानंतर शवविच्छेदनासाठी नातेवाईकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होतात. त्यामुळे ट्रामा केअर सेंटरमध्ये शवविच्छेदनाची सुविधा सुरू होत नाही तोवर पालिकेच्या रुग्णालयात शवविच्छेदन सुविधा सुरू करावी, अशी अपेक्षा डॉ.पाटील यांनी व्यक्त केली. निवेदनाची प्रत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक व भुसावळ पालिकेचे मुख्याधिकारी यांना देण्यात आली आहे.

पाठपुरावा करणार : आमदार संजय सावकारे
अपघाती मृत्यूनंतर शवविच्छेदन होणे कायदेशीर बाब असून त्यासाठी विलंब लागणे ही कुणासाठीीही निश्चित दुःखद घटना आहे. भाजप वैद्यकीय आघाडीच्या माध्यमातून डॉ.नि.तु.पाटील यांनी केलेली सूचना नक्कीच कार्यान्वित झाली तर दिलासा देणारी आहे. यासाठी मी स्वतः अधिकारी वर्गाशी बोलणार असल्याचे आमदार संजय सावकारे म्हणाले.

