काँग्रेसच्या माजी पदाधिकार्यावर हल्ला : दोघा आरोपींना अटक
बोदवड : कौटुंबिक वादानंतर माहेरी असलेली पत्नी मध्यस्थामुळेच सासरी नांदण्यास येत नसल्याचा समज झाल्यानंतर संतप्त पतीने मित्राच्या सोबतीने येवतीतील काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष पुरुषोत्तम उर्फ बाळू पाटील यांच्यावर 7 रोजी सायंकाळी बोदवड-जामठी रस्त्यावर असलेल्या साई मंदिरात चाकूने हल्ला चढवत पळ काढला होता. या प्रकरणी सुरुवातीला बाळू पाटील यांच्यासोबत असलेले भगवान कडू जंगले यांनी फिर्याद दिल्यानंतर अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला मात्र पोलिस चौकशीत संशयीत आरोपी हा बाळू पाटील यांचे बंधू रमेश पाटील यांचा जावई असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी गजानन प्रल्हाद मुंडे (40, रा.मंगलम नगर, शेगाव, जि.बुलढाणा) व सचिन मनोहर लांडे (34, रा.पारस, ता.बाळापूर, जि.बुलढाणा) यांना अटक करण्यात आली आहे.
दोघा आरोपींना दोन दिवसांची कोठडी
रमेश पाटील यांचा जावई असलेला आरोपी गजानन मुंडे याचे पत्नीशी कौटुंबिक कारणावरून वाद सुरू असल्याने पत्नी माहेरीच आहे शिवाय या प्रकरणात मध्यस्थ हे बाळू पाटील असल्याने त्यांच्यामुळे पत्नी नांदण्यास येत नसल्याचा समज आरोपी गजानन मुंडेला झाल्याने त्याने मित्र सचिन लांडेच्या मदतीने बाळू पाटील यांच्यावर चाकूने हल्ला चढवत दुचाकीने पळ काढला. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (एम.एच.28-3417) तसेच हत्यार पट्टीचा चाकू ताब्यात घेतला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड करीत आहेत.


