श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकीच्या टेलिकॉम विभागाच्या विद्यार्थ्यांनी बनवला व्हाईस कंट्रोल रोबोट


प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह : इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान वापरून दर्जेदार उपकरणांच्या निर्मितीत भुसावळचे पाऊल

भुसावळ : श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम विभागाच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा तंत्रज्ञान क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. 2010 पासून देशभरात या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या भुसावळच्या विद्यार्थ्यांनी नॅनोरोबोटिक्स क्षेत्रातही मुसंडी मारली असल्याचे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम विभागाच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या नाविन्यपूर्ण प्रकल्पाची पाहणी करतांना केले. इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम विभागाचे अंतिम वर्षाचे विद्यार्थी तेजस कुळकर्णी, अजय हिरोळे, अरबाज शेख यांनी प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह, डीन डॉ.राहुल बारजिभे, विभाग प्रमुख डॉ. गिरीष कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली घरगुती क्षेत्रापासून संरक्षण क्षेत्रात उपयुक्त आवाजावर नियंत्रित होईल, असा व्हाईस कंट्रोल रोबोट बनवला आहे.

बहुपयोगी व्हाईस कंट्रोल रोबोट
व्हाईस कंट्रोल रोबोट हा मोठ्या-मोठ्या इमारतीखाली असलेले पाईप तपासणी, जीवितहानी रोखण्यासाठी बॉम्ब विल्हेवाट प्रणालीत, अनिश्चित भागात सामग्री वाहतूक करण्यासाठी वापरला जावू शकतो शिवाय लष्करी पाळत ठेवणे, घरातील फरशी साफ करणे, शेतात तण ओळखणे आणि ते काढून टाकणे, रोबोटिक मोर्स मार्स, चंद्र इत्यादी खगोलीय संस्थांवर संशोधन कार्य करण्यासाठी वापरला जाऊ शकतो, अशी माहिती तेजस कुळकर्णी याने दिली.


रोबोसाठी लागले तीन हजार रुपये
हा रोबोट वापरकर्त्याने दिलेल्या सूचनेनुसार काम करतो तसेच या प्रकल्पात मोबाइल अ‍ॅपद्वारे सूचना देऊन हालचाली नियंत्रित करता येतात. मोबाईल ब्लूटूथ एचसी -05 वापरुन रोबोटशी कनेक्ट करता येतो. प्रा.गजानन पाटील, प्रा.धीरज पाटील यांचे मार्गदर्शन घेऊन विद्यार्थ्यांनी हा रोबो तयार केला आहे. त्यासाठी अवघा तीन हजार रुपये खर्च आला असून यात बॅटरी बसविण्यात आली आहे. दोन महिन्यांच्या मेहनतीनंतर हा रोबो तयार झाला. मोटर ड्रायव्हर, डीसी मोटर्स, ब्लुटूथ प्रणाली द्वारे रोबोट कार्य करतो, अशी माहिती अरबाज शेख याने दिली.

स्वयंरोजगाराची दालने खुली
मानवी कौशल्यांशी या रोबोटची तुलना केल्यास ते मानवांपेक्षाही सरस असल्याचे आढळून आले आहे. विद्यार्थी नेहमी इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात नाविण्यता आणण्याचा प्रयत्न करतात. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राच्या प्रगतीमुळे नवीन रोजगाराच्या व स्वयंरोजगाराची दालने खुली झालेली आहेत, असे मत डॉ.गिरीष कुलकर्णी यांनी मांडले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !