मी भाजपातच : आमदार संजय सावकारे
भुसावळ : माजी मंत्री तथा विद्यमान आमदार संजय सावकारे यांचा शुक्रवारी वाढदिवस असल्याने कार्यकर्त्यांनी वृत्तपत्र तसेच सोशल मिडीयावरून दिलेल्या शुभेच्छांमध्ये भाजपा पदाधिकार्यांचे फोटो गायब झाल्याने आमदार सावकारे पुन्हा राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चा जोमाने रंगल्या होत्या मात्र या केवळ अफवा असून आपण भाजपातच असून भाजपातच राहणार असल्याचा पुर्नउच्चार आमदार संजय सावकारे यांनी केला आहे. ते म्हणाले की, कार्यकर्त्यांनी जाहिरातीत काय टाकावे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्याविषयी आपण काही सांगू शकत नाही मात्र मी भाजपातच असल्याचे ते म्हणाले.
भाजपा पदाधिकार्यांचे फोटो नसल्याने चर्चेला ऊत
शुक्रवारी आमदार सावकारेंच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींसह शहरात लागलेल्या बॅनर्सवर भाजपाचे चिन्ह गायब झाले असून त्यात भाजपाला राम-राम करून राष्ट्रवादीत दाखल झालेल्या माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह खासदार रक्षा खडसे यांचे छायाचित्र लावण्यात आले आहे शिवाय सोशल मिडीयावरील जाहिरातींमध्येदेखील भाजपाच्या बड्या नेत्यांचे छायाचित्र नसल्याने सकाळपासून विविध चर्चांना ऊत आला आहे.


