2022 पर्यंत सर्वांना घरांचे उद्दिष्ट
रावेरच्या गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांची कार्यशाळेप्रसंगी माहिती
रावेर : ग्रामीण भागात घरकुलासंदर्भात सर्व योजनांवर काम करण्यात येणार आहे. यामध्ये घरकुलांची गुणवत्ता वाढवणे, प्रलंबित घरकुले पूर्ण करणे तसेच तालुक्यात एक हजार 921 लाभार्थी असे आहे की त्यांना जागा नाही, त्या लाभार्थींना जागा उपलब्ध करून देण्यासाठी लोकप्रतिनिंधीनी सहकार्य करण्याचे आवाहन करीत 2022 पर्यंत सर्वांना घरांचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल यांनी येथे केले. ‘सर्वांसाठी घरे’ या महाआवास अभियानांतर्गत ग्रामीण तालुकास्तरीय कार्यशाळेचे शुक्रवारी रावेर पंचायत समितीत आयोजन करण्यात आले. याप्रसंगी गटविकास अधिकार्यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे उद्घाटन
आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.
यांची कार्यशाळेला उपस्थिती
घरकुलासंदर्भात महत्वपूर्ण कार्यशाळेला आमदार चंद्रकांत पाटील, जिल्हा परीषद अध्यक्षा रंजना पाटील व्हिडीओ कॉन्फ्रन्सिंगद्वारे सहभागी झाल्या होत्या. पंचायत समिती सभापती जितू पाटील, उपसभापती जुम्मा तडवी, गटविकास अधिकारी दीपाली कोतवाल, विस्तार अधिकारी डी.एस.सोनवणे, हरलाल कोळी आदी उपस्थित होते. तालुक्यातील इतर पंचायत समिती सदस्य, सरपंच, ग्रामसेवक व्हिडिओ कॉन्फ्रन्सिंगद्वारे सहभागी झाले होते.

घरकुलच्या जागांसाठी पाठपुरावा करणार : आमदार
रावेर तालुक्यात घरकुल बांधकामासाठी ज्या लाभार्थांकडे जागा उपलब्ध नाही त्यांना ती जागा मिळवून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असून तालुक्यात गावठाण जागा नसल्याने पंचायत समिती प्रशासनाला जागा देण्यासाठी खूप अडचण निर्माण होत आहे. यासाठी लवकरच महसूल आणि पंचायत समितीची बैठक घेऊन घरकुल लाभार्थींना जागा देण्यासाठी पाठवपुरा करणार असल्याचे कार्यशाळेत आमदार शिरीष चौधरी म्हणाले.

