भुसावळच्या सुपुत्राची बाटूच्या कार्यकारी सदस्यपदी निवड


जळगाव विभागात तांत्रिक शिक्षण मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ.राहुल बारजिभे

भुसावळ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वेदला रामा शास्त्री यांनी महाराष्ट्र स्तरावर शिक्षणाची उच्च पातळी, उत्तम दर्जाच्या संशोधनास प्रोत्साहन, सहकार्यत्मक व्यवस्थापन, उच्च शिक्षणाचा प्रचार व प्रसार, योग्य तंत्रज्ञान व पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा दृष्टीने भुसावळ येथील श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डीन डॉ.राहुल बारजिभे यांची विद्यापीठ क्षेत्रातील सर्वोच्च प्राधिकरणावर म्हणजेच कार्यकारी समितीच्या सदस्यपदी निवड केलेली आहे.

राज्य स्तरावर प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान
डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे हे महाराष्ट्र सरकारद्वारा संचलित एकमेव तंत्रशास्त्र विद्यापीठ आहे. महाराष्ट्रातील 200 पेक्षा जास्त अभियांत्रिकी, फार्मसी महाविद्यालये या विद्यापीठाशी संलग्न असून जळगाव विभागाचा राज्य स्तरावर प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान डॉ.राहुल बारजिभे यांना मिळाला आहे.


निवडीनंतर शुभेच्छांचा वर्षाव
डॉ.बारजिभे यांनी यापूर्वी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागाच्या बोर्ड ऑफ स्टडीज, फॅकल्टी ऑफ इंजिनीअरींग, डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या मेकॅनिकल अभियांत्रिकी विभागाच्या बोर्ड ऑफ स्टडीज, बाटूच्या असोसिएट डीन, बाटूच्या अकॅडेमिक कॉउन्सिल अश्या विविध प्राधिकरणावर उत्कृष्ट पध्दतीने कार्य करीत आपला ठसा उमटवला आहे. विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉ.बी.एफ.जोगी व अन्य सदस्यांनी अभिनंदन केले आहे तर हिंदी सेवा मंडळाचे अध्यक्ष जे.टी.अग्रवाल, सचिव मधूलता शर्मा, कोषाध्यक्ष एम.डी.तिवारी व पदाधिकार्‍यांनी डॉ.बारजिभे यांचे कौतुक केले.

विशेष कार्य करण्याची इच्छा : डॉ.बारजिभे
हा आनंददायी क्षण आहे. तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील बदलते प्रवाह व नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून देशातील इतर विद्यापीठापेक्षा चांगल्या गोष्टींचा समावेश तंत्र शिक्षणात कसा करता येईल याबाबत विशेष कार्य करण्याची इच्छा आहे. राष्ट्रीय व सामाजिक प्राथम्य विचारात घेऊन विद्यार्थ्यांचे सर्वांगीण व्यक्तिमत्त्व घडवण्याची जबाबदारी स्वीकारली असून जळगाव परिसरातील संलग्न महाविद्यालयाच्या विकासात्मक गरजांना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ.राहुल बारजिभे यांनी सांगितले.

परीवर्तनशील उपक्रम राबविणार्‍या व्यक्तीची निवड : प्राचार्य
जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञान संसाधनांच्या निर्मितीस त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले आहे. विकासाच्या दृष्टीने आजीवन शिक्षणाचा पुरस्कार त्यांनी केला असून नाविण्यपूर्ण तंत्रज्ञान तसेच उपाययोजना व सेवा विकसीत करून त्या उपलब्ध करून देण्यावर त्यांचा नेहमीच भर राहिलेला आहे. सुप्त कौशल्ये व क्षमता अंगी असलेली व्यक्ती म्हणून त्यांची समाजात ओळख आहे, परीवर्तनशील उपक्रम राबविणार्‍या व्यक्तीची सदस्यपदी निवड झाल्याने विद्यापीठात मूल्याधिष्ठित व जागतिक दर्जाची शिक्षण प्रणाली, प्रशासन निर्माण होईल, असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह म्हणाले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !