भुसावळात दोन बंद घरे फोडली : 40 हजारांचा मुद्देमाल लंपास


दोन्ही चोर्‍यांमध्ये चोरट्यांनी 40 हजारांच्या मुद्देमालावर मारला डल्ला : पोलिस अधिकार्‍यांकडून घटनास्थळाची पाहणी : एकच चोरटे असल्याचा संशय

भुसावळ : शहरात चोरटे पुन्हा सक्रिय झाले असून शिवपूर कन्हाळा रस्त्यासह आर.एम.एस.कॉलनीतील बंद घरांना चोरट्यांनी टार्गेट करीत मुद्देमाल लांबवल्यो रहिवाशांमध्ये भीती पसरली आहे. दोन्ही ठिकाणी झालेल्या चोर्‍या रविवारी सकाळी उघडकीस आल्या. शहरात यापूर्वी झालेल्या चोर्‍या-घरफोड्यांचा तपास थंडबस्त्यात असताना नव्याने होणार्‍या चोर्‍यांमुळ पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी व चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दोन बंद घरांना केले टार्गेट
शहरातील शिवपूर कन्हाळा रोडवरील आरएमएस कॉलनीतील रहिवासी सोनल कुलेवार हे पुणे येथे शुक्रवारी गेल्याने घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली. रविवारी सकाळी घराचा दरवाजा उघडा दिसल्यानंतर शेजार्‍यांनी कुलेवार यांना दूरध्वनीवरून विचारणा केल्यानंतर त्यांनी पुण्यात आल्याची माहिती दिल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्यांनी कडी-कोयंडा तोडून लाकडी कपाटातील मंगळसूत्र तसेच कपाटातून नऊ हजारांची रोकड मिळून 20 हजारांच्या ऐवजावर डल्ला मारला.


आयुध निर्माणीतील कर्मचार्‍याकडेही चोरी
आरएमएस कॉलनी परीसरातील ‘निर्मल विलास’ या निवासस्थानात आयुध निर्माणीतील कर्मचारी प्रसाद जगदीश प्रसाददास हे वास्तव्यास आहे. ते रेल्वे फिल्टर हाऊस परीसरातील घरी वास्तव्यास असल्याची संधी साधल्यानंतर चोरट्यांनी घरातून चांदीचा कंबरपट्टा तसेच पायल लांबवली. शेजार्‍यांना घराचा दरवाजा उघडा दिसल्यानंतर त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकल्याने त्यांनी प्रसाद दास यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी बाजारपेठ पेठ पोलिसात चोरीची तक्रार दिली. चोरीची माहिती कळताच बाजारपेठचे प्रभारी पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, सहा.पोलिस निरीक्षक कृष्णा भोये, सहा.फौजदार तस्लीम पठाण, प्रशांत परदेशी, अजय चव्हाण यांनी भेट देऊन पाहणी करीत पंचनामा केला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !