प्रति जेजुरी असलेल्या फैजपूरातील खंडोबा महाराज यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात
फैजपूर शहरात यात्रोत्सवाची तयारी पूर्ण : 17 ते 24 दरम्यान साजरा होणार यात्रोत्सव ; लाखोंची उलाढाल होणार
फैजपूर : प्रति जेजुरी म्हणून ओळख असलेल्या शहरातील खंडोबा महाराज यात्रोत्सवाला गुरुवार, 17 पासून सुरुवात होत असून 24 मार्चंपर्यंत हा यात्रोत्सव चालणार आहे. जेजुरीनंतर सर्वात मोठी यात्रा म्हणजे फैजपूरातील खंडोबाची यात्रा भरते. मंदिराचा प्रतिस्थापना दिवस म्हणून फाल्गुन शुद्ध होळी पौर्णिमेपासून सलग आठ दिवस यात्रा महोत्सव म्हणून साजरा केला जातो. ही धार्मिक परंपरा फैजपूर शहरवासीयांनी आजही जपली आहे. यात्रा महोत्सवात गुळाची रेवडी व जिलेबी, महाकाय विद्युत पाळणे, रात्रीचे तमाशा मंडळ यात्रा महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरते.
यात्रोत्सवाला प्राचीन इतिहास
फैजपूर खंडोबा यात्रा व देवस्थानास सुमारे साडेपाचशे वर्षा पूर्वीचा धार्मिक व ऐतिहासिक इतिहास आहे. पुरातन जागृत देवस्थानाला परमपूज्य अहिल्याबाई होळकर, राजा छत्रपती शिवाजी महाराज, पेशवा, कवयित्री बहिणाबाई चौधरी यासह अनेक थोर संतांनी राष्ट्र भक्तांनी आवर्जून भेटी दिल्याच्या नोंदी आहेत. आजही या मंदिरास मध्य प्रदेशातील इंदूर येथील सुप्रसिद्ध होळकर घराण्याची सनद प्राप्त होते. या मंदिराचे तत्कालीन ब्रह्मलीन गादीपती परमपूज्य आत्मानंद महाराज यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात आचार्य विनोबा भावे सोबत भूदान आंदोलनात तर साकेत वाशी ब्र.घनश्यामदास जी ब्रह्मचारी महाराज यांनी स्वातंत्र्यानंतरच्या काळात आमदार सिंधुताई पार्थ चौधरींसोबत गोवा मुक्ती आंदोलनात सिंहाचा सहभाग घेतल्याची नोंद आहे. घनश्याम महाराज यांनी फैजपूर नगरपरीषदेमध्ये अखंडितपणे 35 वर्ष नगरसेवक म्हणून लोकप्रतिनिधीत्व केले आहे.
यात्रोत्सवानिमित्त प्रशासनाचे नियोजन
कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्षांपासून यात्रोत्सव रद्द केला जात होता मात्र यंदा होत असलेल्या यात्रोत्सवानिमित्त भाविकांमध्ये आनंदाला उधाण आले आहे. भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन मंदिर परीसरात, संपूर्ण यात्रोत्सव परीसरात, गाडी पार्किंग आदी महत्त्वाच्या जागी सीसीटीव्ही कॅमेरे व पोलिस प्रशासनातर्फे जागोजागी कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. यात्रोत्सवात महिला भाविकांनी किंमती आभूषणे व महागड्या वस्तू सोबत आणू नये तसेच कोणत्याही अफवांवर शहानिशा केल्याशिवाय विश्वास ठेवू नये, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे, सहाय्यक निरीक्षक सिद्धेश्वर आखेगावर यांनी केले आहे.


