जीवनात विचार आचार व संस्काराने श्रीमंत व्हा : सहा.निरीक्षक रुपाली चव्हाण
यावल : शिक्षणाने विचारांचे जागरण होऊन संस्कारीत मन तयार होते. संस्कारीत झालेला माणूस आदर्श समाज निर्माण करण्यात महत्वाची भूमिका निभावतो. त्यासाठी माणूस म्हणून विचार आचार व संस्काराने श्रीमंत व्हा, असे आवाहनवजा प्रतिपादन सहाय्यक पोलिस निरीक्षक रुपाली चव्हाण यांनी केले. भालोद येथील कला व विज्ञान महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने आयोजित स्त्री पुरुष समानता अभियानाच्या सांगता समारोप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ.वर्षा नेहेते होत्या.
ध्येयपूर्तीसाठी घ्यावी मेहनत
रुपाली चव्हाण म्हणाल्या की, शिखक्षणातून माणूस समृद्ध होतो. त्यासाठी प्रत्येकाने आपले ध्येय निश्चित करून त्या ध्येयपूर्ती साठी मेहनत घेतली पाहिजे. वैचारीक अंगाने श्रीमंत होऊन जीवनातील सर्वच प्रकारची विषमता सोडून डोळस व्हायला हवे. आज समाजात भूतकाळात उपेक्षित ठरलेला वर्ग शिक्षणातून उभा राहून स्वतः सह समाज व राष्ट्राच्या प्रगतीत हातभार लावतोय. स्त्रीया प्रत्येक क्षेत्रात आपलं अतुलनीय योगदान देत आहेत. त्यासाठी स्वतःमधील न्यूनगंड बाजूला सारून हिमतीने पुढे या. वाईट कामाची लाज बाळगा. चांगले काम करतांना हिंमतीने पुढे या. मुलींनी स्वतःासह इतरांचे संरक्षण करून कुटुंबाचे आधार व्हा. कुणारही अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःचे अस्त्वि स्वतः निर्माण करा. अन्याय सहन करू नका व कुणावरही अन्याय करू नका. त्यासाठी संविधानाने दिलेले अधिकार, कायदे व शासनाच्या योजना यांचा अभ्यास करून इतर आपल्या भगिनीना समजावून सांगा. खरे खोटे ओळखून जीवनात यशस्वी होण्याचा मार्ग केवळ आणि केवळ दर्जेदार शिक्षणच देते. त्या साठी ज्ञानी व्हा !, असे आवाहन त्यांनी केले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
प्रास्ताविक व पाहुण्यांचा परीचय या अभियानाचे प्रमुख प्रा.डॉ. सुनील नेवे यांनी करून दिला तर सूत्रसंचालन भूमती चोपडे तर आभार प्रदर्शन रोहित सोनवणे यांनी मानले. कार्यक्रमाची सुरुवात लोकाक्षी चौधरी, भाग्यश्री देशमुख,नयना जालंधर या विद्यार्थिनींनी स्वागत गीताने केली. कार्यक्रमास अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रा.डॉ.जतीन मेढे. माजी प्राचार्य प्रा.डॉ.अजय कोल्हे, प्रा.डॉ. दिनेश महाजन आदी मान्यवर मंचावर होते. प्रसंगी स्त्री पुरुष समानता अभियानात घेतलेल्या विविध स्पर्धामध्ये बक्षीस मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. सदस्य प्रा.डॉ.मीनाक्षी वाघुळदे, प्रा राकेश चौधरी, प्रा.गीतांजली चौधरी, प्रा. फाल्गुनी राणे आदींनी परीश्रम घेतले.