प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह : अनिल देशमुखांचा आरोप
मुंबई (23 सप्टेंबर 2024) : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा इन्काउंटर झाल्यानंतर विरोधकांनी याप्रकरणावर टिका-टिपणी केली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आरोपी अक्षय शिंदे जेवढा दोषी होता तितकेच दोषी शाळा चालक भाजप पदाधिकारी देखील आहेत तसेच, आपल्या पक्षातील पदाधिकार्याला वाचवण्यासाठी आणि प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह सेट केले जात असल्याचे अनिल देशमुख यांनी म्हटल्याने नवीन राजकीय वादाला तोंड फुटले आहे.
हा तर भाजपा पदाधिकार्यांना वाचवण्याचा प्रयत्न
अनिल देशमुख यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाल्याचे वृत्त समजले. स्वसंरक्षणाचा हा बनाव विश्वास ठेवण्यासारखा नाही. दोन्ही हातात बेड्या असलेला माणूस पोलिसांचेही पिस्तूल कसे हिसकाऊ शकतो ? या प्रकरणात आरोपी अक्षय शिंदे जेवढा दोषी होता तितकेच दोषी शाळा चालक भाजप पदाधिकारीदेखील आहेत. आपल्या पक्षातील पदाधिकार्याला वाचवण्यासाठी आणि प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह सेट केले जात आहे.

इन्काउंटरमध्ये आरोपी ठार
आरोपी अक्षय शिंदे याने दोन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल त्याच्याविरोधात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत तर कल्याण न्यायालयात त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले. आरोपीने दोन पत्नी सोबत अनैसर्गिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. दुसर्या पत्नीने केलेल्या याच आरोपाची चौकशी करण्याकरिता सोमवारी सायंकाळी सव्वासहा वाजता शिंदे याचा तळोजा कारागृहातून ट्रान्झिट रिमांडच्या आधारे ताबा घेऊन पोलिस त्याला ठाण्याकडे आणत असताना त्याने पोलिसांच्या वाहनात शेजारी बसलेल्या सहायक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे यांचे रिव्हॉल्वर हिसकावून त्यांच्या दिशेने गोळीबार केला.
मोरे यांच्या पोटाला व मांडीला इजा झाल्याने ते गंभीर जखमी झाले. शिंदे याने एकूण तीन राउंड फायर केले. मात्र, त्याच्या दोन गोळ्यांमध्ये सुदैवाने कुणीही जखमी झाले नाही. शिंदे हा पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याची भीती असल्याने सीआययूचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय शिंदे यांनी आपल्याकडील रिव्हॉल्वरमधून शिंदेच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. या गोळीबारात शिंदे जबर जखमी झाला. त्याला तातडीने कळवा येथील महापालिका रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तो मरण पावल्याचे सायंकाळी उशिरा जाहीर करण्यात आले.




