सायबर गुन्ह्यांपासून सावध राहा : अरविंद वानखेडे


भालोद, ता.यावल (25 जानेवारी 2025) : सायबर गुन्हेगार विविध क्लृप्त्या वापरून आपली फसवणूक करतात त्यामुळे अनोळखी लिंकवर क्लीक करू नका तसेच मोबाईलवर अनोळखी व्यक्तींशी चॅटींग टाळावी तसेच आपल्या एटीएमचा पिन व बँक खात्याचा तपशील कुणालाही शेअर करू नका, असे आवाहन जळगाव सायबर पोलीस ठाण्याचे अंमलदार अरविंद वानखेडे यांनी केले. ते प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान अंतर्गत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच विद्यार्थ्यांकरीता संवेदनात्मक उपक्रम कार्यशाळा झाली. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.किशोर कोल्हे होते.

चारही घटकांवर विद्यार्थ्यांनी सखोल अभ्यास करावा
उद्घाटन अहिल्याबाई कन्या विद्यालय, भुसावळ येथील शिक्षक व पर्यावरण तज्ञ नाना पाटील व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. प्राचार्य डॉ.किशोर कोल्हे यांनी कार्यशाळेचा उपयोग विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात करण्याचे आवाहन करीत आर्थिक साक्षरता, डिजिटल साक्षरता, सामाजिक साक्षरता आणि पर्यावरण साक्षरता या चारही घटकांवर विद्यार्थ्यांनी सखोल अभ्यास करून आपले भावी आयुष्य सुरक्षित करण्याचे आवाहन केले.

चार सत्रात कार्यशाळा
कार्यशाळेत चार सत्रे झाली. पहिल्या सत्रात पर्यावरण साक्षरता या विषयावर नाना पाटील यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण कसे जपावे याबाबत मार्गदर्शन केले. दुसर्‍या सत्रात डिजिटल साक्षरता या विषयावर सायबर पोलीस स्टेशनचे अंमलदार अरविंद वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आभार प्रा.डॉ.जतीन मेढे यांनी मानले. तिसर्‍या सत्रात सामाजिक साक्षरता या विषयावर भुसावळ येथील सामाजिक कार्यकर्त्या आरती चौधरी यांनी विद्यार्थ्यांनी समाजशील होणे गरजेचे असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.मीनाक्षी वाघुळदे यांनी केले. चौथ्या सत्रात जळगावच्या मु.जे.महाविद्यालयातील वाणिज्य शाखेच्या प्राध्यापिकस व कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्या डॉ.सुरेखा पालवे यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात आर्थिक काटकसरीचा उपयोग करावा, पैशांचे महत्त्व समजून घ्यावे, असे आवाहन केले.

यांची समारोपाला उपस्थिती
समारोप कार्यक्रमाला डॉ.सुरेखा पालवे, प्राचार्य डॉ.किशोर कोल्हे, उपप्राचार्य मुकेश चौधरी, कार्यशाळा समन्वयक डॉ.सुनील नेवे, समिती सदस्य डॉ. जतीन मेढे, डॉ.मीनाक्षी वाघुळदे, प्रा.राकेश चौधरी व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यशाळेमध्ये 150 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.किशोर कोल्हे होते. सूत्रसंचालन डॉ.दिनेश पाटील तर आभार प्रदर्शन डॉ.सुनील नेवे यांनी मानले.


कॉपी करू नका.