दिल्ली-मुंबईवर दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला : नऊ संशयीत जाळ्यात
दिल्ली (1 जून 2026) : देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईवर मोठा दहशतवादी हल्ला घडवून आणण्याचा कट सुरक्षा यंत्रणांनी वेळीच उधळला आहे. दिल्ली पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एकूण नऊ संशयितांना अटक केली. मुंबई, दिल्लीसह देशातील इतर महत्त्वाच्या शहरांना लक्ष्य करण्याचा कट आरोपींनी रचल्याची माहती प्राथमिक तपासात समोर आली आहे. या कारवाईनंतर दिल्ली आणि मुंबईसह देशातील प्रमुख शहरांतील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर गेल्या आहेत.
काय आहे नेमके प्रकरण ?
दिल्ली पोलिसांनी काही दिवसांपासून संशयित हालचालींवर गुप्तपणे लक्ष ठेवले होते. त्यानंतर करण्यात आलेल्या कारवाईत नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दिल्ली, मुंबई आणि पंजाबमधील काही जणांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. प्राथमिक तपासात या संशयितांचा पाकिस्तानातील शहजाद भट्टी नावाच्या व्यक्तीशी संपर्क असल्याची माहिती समोर आली असून, त्याच्या माध्यमातून भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणण्याचे नियोजन सुरू असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
मुंबईत अनेक भागांची रेकी
तपासादरम्यान सर्वात गंभीर बाब म्हणजे आरोपींनी मुंबईतील अनेक महत्त्वाच्या भागांची रेकी केल्याचे उघड झाले आहे. मुंबईतील दादर रेल्वे स्थानकासह काही संवेदनशील भागांचे व्हिडीओ आणि माहिती आरोपींकडून जप्त करण्यात आल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, या व्हिडीओंमध्ये रेल्वे स्थानकांव्यतिरिक्त विमानतळ, अणुऊर्जा केंद्र, वीज निर्मिती प्रकल्प आणि इतर महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणांची दृश्ये असल्याची माहिती तपास यंत्रणांकडून मिळत आहे. त्यामुळे संभाव्य हल्ल्याचे स्वरूप अत्यंत गंभीर असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
अटक केलेल्या आरोपींकडून मोठ्या प्रमाणात संशयास्पद साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्यांच्याकडून ग्रेनेडसह काही अत्याधुनिक शस्त्रे आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती समोर आली आहे. या साहित्याच्या आधारे तपास यंत्रणा आरोपींच्या नेटवर्कचा आणि त्यांच्या पुढील नियोजनाचा तपास करत आहेत. या कटामागे देशांतर्गत आणि परदेशातील आणखी कोणते दुवे आहेत का, याचाही शोध सुरू आहे.
या कारवाईनंतर दिल्ली आणि मुंबई पोलिसांनी महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था आणखी कडक केली आहे. रेल्वे स्थानके, विमानतळ, सरकारी कार्यालये आणि गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे समजते. केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनाही सतर्कतेचे निर्देश देण्यात आले असून, विविध शहरांतील संवेदनशील ठिकाणांवर नजर ठेवण्यात येत आहे.
