पुन्हा गुन्हेगारीकडे वळाल तर गाठ माझ्याशी !


भुसावळातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह हिस्ट्रीशीटरांना पोलिस उपअधीक्षकांची तंबी

भुसावळ : भुसावळ शहरासह विभागात वाढलेल्या गुन्हेगाराला आळा घालण्यासाठी पोलिस दलातर्फे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. भुसावळात नवीनच पदभार घेतलेल्या पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनीदेखील शहरातील वाहतूक व्यवस्थेसह गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी सर्वच पोलिस ठाण्यातील प्रभारी अधिकार्‍यांना सूचना केल्या आहेत. शनिवारी बाजारपेठ पोलिस ठाण्यात विभागातील 19 हिस्ट्रीशीटरसह रेकॉर्डवरील 12 आरोपींची त्यांनी ओळख परेड घेत त्यांना गुन्हेगारीकडे पुन्हा वळल्यास वा नव्याने कुठल्या गुन्ह्यात सहभाग आढळल्यास गाठ माझ्याशी असल्याची तंबीही वाघचौरे यांनी दिल्यानंतर गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्यांच्या गोटात खळबळ उडाली. यावेळी बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्यासह बाजारपेठ पोलिस स्टेशन, तालुका पोलिस स्टेशन, शहर पोलिस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी उपस्थित होते.

वर्तणूक सुधारण्याबाबत समज
पोलिस उपअधीक्षक वाघचौरे म्हणाले की, बाजारपेठ पोलिस स्टेशनचे 11, शहर पोलिस स्टेशनचे पाच तर तालुका पोलिस स्टेशनचे तीन अशा 19 हिस्ट्रीशीटरसह 12 रेकॉर्डवरील आरोपींची ओळख करून घेण्यात आली शिवाय संबंधिताचा चौकशी फार्म भरून घेण्यात आला. संबंधिताकडे असलेले वाहन, मोबाईल क्रमांक, वास्तव्यास असलेले ठिकाण, कामाचे स्वरूप आदींबाबत माहिती जाणून घेण्यात आली तसेच वर्तणूक सुधारण्याबाबत समज देण्यात आली. विभागातील सर्व पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यांना दररोज रात्री प्रत्येकी चार गुन्हेगार तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गुन्हेगारी रात्री घरी असल्यास तशी नोंद घेतली जाते शिवाय गुन्हेगार रात्री घरी न आढळल्यास दुसर्‍या दिवशी संबंधिताचा ठावठिकाणी तांत्रिक सहाय्याने शोधला जातो.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !