नंदगावात भरदिवसा चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घरातून 50 हजारांचा ऐवज लंपास


जळगाव : तालुक्यातील नंदगाव येथे अज्ञात चोरट्यांने भरदिवसा शेतमजूराचे बंद घर फोडून घरातील सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास केली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. शरद भास्कर धनगर (48, रा.ग्रामपंचायतीसमोर नंदगाव, ता.जि.जळगाव) हे शेतमजूर असून आपल्या पत्नीसह शेतात जावून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दररोज सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजता ते शेतात जातात. नेहमीप्रमाणे दुसर्‍यांच्या शेतात जाण्यासाठी 4 डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता घराला कुलूप लावून गेले. अज्ञात चोरट्यांने दुपारी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत घरातील 25 हजार रुपयांची रोकड आणि 12 हजार 500 रुपये किंमतीचे सोन्याचे टोंगल आणि 12 हजार 500 रुपये किंमतीचे सोन्याचे काप असा एकूण 50 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला. सायंकाळी कामावरून घरी आल्यानंतर घरात चोरी झाल्याचे शरद धनगर यांच्या पत्नीच्या लक्षात आले. शनिवार, 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता तालुका पोलिस ठाण्यात गाठले. शरद धनगर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक प्रशांत पाटील करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !