विटव्यासह वाघोडच्या संतप्त शेतकर्‍यांची भूमी अभिलेख कार्यालयावर धडक


शेती मोजणीचे पैसे घेवूनही कर्मचारी न आल्याने शेतकर्‍यांचा संताप

रावेर : शेतीच्या मोजणीसाठी शेतकर्‍यांकडून पैसे घेऊनही येथील भूमी अभिलेख विभागाचे कर्मचारी मोजणीसाठी न आल्याने विटवा व वाघोडच्या सुमारे 25 ते 30 शेतकर्‍यांनी या कार्यालयावर सोमवारी धडक दिली. 12 वाजेपर्यंत एकही कर्मचारी कार्यालयात उपस्थित नसल्याने कार्यालयाला कुलूप लावलेले दिसून आले यामुळे शेतकर्‍यांच्या संतापाचा पारा अधीकच चढला व त्यांनी तब्बल अडीच तास कार्यालयासमोर ठिय्या मारला. 12.30 वाजता कर्मचारी आल्यावर शेतकर्‍यांनी या कर्मचार्‍यांना जाब विचारला असता त्याने उडवा-उडवीची उत्तरे दिल्याने शेतकर्‍यांचा अधिक संताप झाला.

कर्मचार्‍याने घातला शेतकर्‍यांशी वाद
तालुक्यातील वाघोड, विटवा येथील शेतकर्‍यांनी शेत-जमीन मोजणीसाठी येथील भूमी अभिलेख कार्यालयात नियमानुसार फी भरलेली आहे. त्यापैकी विटवा येथील सचिन महाजन यांच्या शेत-जमिनीच्या मोजणीसाठी या कार्यालयाने 3 डिसेंबर तारीख संबंधित शेतकर्‍याला नोटीस देऊन कळवली होती. त्यानुसार या दिवशी महाजन दिवसभर शेतात सर्व मोजणीच्या साहित्यनिशी थांबून होते मात्र अधिकारी मोजणीसाठी आलेच नाही तर दुसर्‍या दिवशी महाजन यांना कोणतीही पूर्वसूचना न देता या अधिकार्‍यांनी 4 डिसेंबरला मोजणी करीत दिशाभूल केल्याची तक्रार सचिन महाजन यांनी केली आहे तर वाघोड येथील कल्पेश बोरणारे या शेतकर्‍याला सोमवार, 7 रोजी मोजणीसाठी वेळ दिलेली असतांना या विभागाचे कोणीही अधिकारी व कर्मचारी मोजणीसाठी न आल्याने बोरणारे यांनी भूमी अभिलेख कार्यालय गाठले. निंभोरासीम, विटवा, वाघोड व रावेर येथील शेतकर्‍यांनी संतप्त होत या कार्यालयावर सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास धडक दिली मात्र कार्यालयाला कुलूप असल्याचे दिसून आल्याने शेतकरी अधिकच आक्रमक झाले व त्यांनी ठिय्या मारला. 12.30 वाजता कर्मचारी आल्यावर शेतकर्‍यांनी मोजणीसाठी का आले नाही? याचा जाब विचारला मात्र तडवी नामक कर्मचार्‍याने उडवाउडवीची उत्तरे देत शेतकर्‍यांशी वाद घातला .


28 पैकी केवळ 3 कर्मचारी उपस्थित
या कार्यालयात एकूण 28 कर्मचारी असून सोमवारी 12.30 वाजेपर्यंत केवळ तीन कर्मचारी उपस्थित होते त्यामुळे गैरहजर कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी उपस्थित शेतकर्‍यांनी केली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !