चिंचखेड्यात भर दिवसा घरातून साडेपाच लाखांचे दागिने लांबवले
पाचोरा : तालुक्यातील चिंचखेडा येथे अज्ञात चोरट्यांनी उघड्या घरातून तब्बल साडेपाच लाखांचे दागिने तसेच 20 हजारांची रोकड लांबवल्याची घटना सोमवारी घउली. या प्रकरणी पाचोरा पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. चिंचखेडा खुर्द येथील प्रकाश पाटील यांचे रस्त्याला लागुनच घर असून सोमवारी चोरट्यांनी गोदरेज कपाटातील 40 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे 2 जोड टोंगल, 10 हजार रुपये किंमतीचे कॅप, 20 हजार रुपये किंमतीचे डोरल पोत, 72 हजार रुपये किंमतीच्या तीन सोन्याच्या अंगठ्या, 1 लाख 20 हजार रुपये किंमतीचा चपला हार, 40 हजार रुपये किंमतीचे मनी मंगळसूत्र, 36 हजार रुपये किंमतीच्या दोन जोड बाळ्या, 20 हजार रुपये किंमतीची अंगुठी, 12 हजार रुपये किंमतीचे कानातील एक जोड, अशा 5 लाख 50 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व 20 हजार रुपये रोख असे मिळुन 5 लाख 70 हजाराचा ऐवज लंपास केला. तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गणेश चौबे हे करीत आहेत.

