बोदवड तालुक्यातील कोल्हाडी येथील बालिकेचे अपहरण
बोदवड : तालुक्यातील कोल्हाडी येथे एका बालिकेचे अपहरण केल्याची घटना दिनांक सोमवार, 7 रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, बालिकेला पळवून नेणार्या आरोपीस अडविण्याचा प्रयत्न करणार्या दोन बालिकांना आरोपीने मारहाण केली. कोल्हाडी येथे सोमवार रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास प्रमोद एकनाथ ढाके यांच्या शेतातील घराजवळ आरोपी प्रकाश रतन बावसकर याने 12 वर्षीय बालिकेला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून पळविले. बालिकेला पळवत असताना दुसर्या दोन बालिकांनी संशयित आरोपीला अडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा संशयीत आरोपीने दोघा बालिकांना मारहाण केली व पळून गेला. या घटनेबाबतची फिर्याद मुलीच्या वडिलांनी दिली आहे. त्यावरून अपहरण तसेच अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नरेंद्र पिंगळे करीत आहेत.

